रागदारी संगीत, मणिपुरी-कथक अशा शास्त्रीय नृत्यावर आधारित चित्रमालिका.. पार्वती-द्रौपदी-अहल्या-राधा या संस्कृत नाटय़ नायिका.. रंभा-मेनका-उर्वशी-अप्सरा.. साहित्यातील नवरस.. गंगा नदीला तपस्विनी, यमुना नदीला विलासिनी आणि गोदावरीला लोकमाता अशी नद्यांना मिळालेली मानवी रूपे.. ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या चित्रशैलीचे विलोभनीय दर्शन त्यांच्याच चित्रांच्या प्रतिकृतींमधून गुरुवारी घडले.
चित्रकार दीनानाथ दलाल जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून हा योग जुळवून आणला आहे. ‘आदरांजली’ या प्रदर्शनाद्वारे दलाल यांच्या लोकप्रिय चित्रांच्या प्रतिकृती राज्यातील विविध चित्रकारांनी चितारलेल्या असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव कला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ चित्रकार रामकृष्ण कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे प्रकृती ठीक नसल्याने उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे बंधू रामकृष्ण कांबळे यांनी उद्घाटन केले. प्रसिद्ध चित्रकार अनिल उपळेकर, सुरेश लोणकर, सुनीती हलसगीकर आणि शुभदा उपळेकर या वेळी उपस्थित होत्या. शनिवापर्यंत (१२ मार्च) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार असून यामध्ये दीनानाथ दलाल यांच्या चित्रांच्या प्रतिकृती असलेली ८० चित्रे रसिकांना पाहता येतील.
‘फिगर ड्रॉईंग’वरचे प्रभुत्व, स्ट्रोक्सचा प्रभावी वापर, स्त्री प्रतिमांमधील गोडवा, आकर्षक रंगसंगती ही दलाल यांच्या चित्रांची वैशिष्टय़े होती, असे रामकृष्ण कांबळे यांनी सांगितले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती ग्रंथातील छत्रपती शिवाजीमहाराज यांची रेखाटने आजही प्रमाण मानली जातात. त्यांनी चितारलेला मत्स्यभेद करणारा अर्जुन पाहताना आपणच मयसभेत आहोत असा भास पाहणाऱ्या रसिकाला होतो. तसेच, रागावरील चित्रांतून दिसणारी लय ही दलाल यांच्या कामातील सहजता आणि प्रगल्भतेची उदाहरणे आहेत. जन्मजात कलाकार असले तरी परिश्रमातून त्यांनी स्वत:ला घडविले, असेही कांबळे यांनी सांगितले.