माणसाच्या बधिर झालेल्या जाणिवा कलेच्या माध्यमातून जागृत करणे हे कलेच्या अस्तित्वाचे मूळ प्रयोजन आहे. सध्या नाटक, नृत्य आणि संगीत या ‘परफॉर्मिग आर्ट’ला जास्त महत्त्व दिले जात आहे. चित्र आणि शिल्प या कलादेखील तेवढय़ाच महत्त्वाच्या असून, सरकारने त्यांचे महत्त्व ओळखायला हवे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले.
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गुरुवर्य डी. एस. खटावकर कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. डी. एस. खटावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खटावकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी आणि शाहीर हेमंत मावळे यांचे कॅनव्हासवर चित्र रेखाटून तेंडुलकर यांनी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केले. मनपा क्रीडा निकेतनमधील दीप्ती धाराशिवकर आणि ऋतुजा कांबळे या गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात आली. खटावकर यांचे चिरंजीव आणि शिल्पकार विवेक खटावकर, दरबार बँडचे इक्बाल दरबार, सुरेश लोणकर, दत्तात्रय कावरे, दिलीप गिरमकर, नितीन पंडित या वेळी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, माणसाच्या बधिर होत चाललेल्या संवेदनांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. एक कलाकार हा माणूस म्हणून कसा आहे याचेही मूल्यमापन करून मगच त्याच्या कलेचे मूल्यांकन व्हावे. कलाकार केवळ मोठा असून उपयोगाचा नाही, तर तो समाजाशी जोडलेला असणे आवश्यक आहे. प्रा. खटावकर यांचे प्रदर्शन गर्दीच्या ठिकाणी भरवून त्यांचा समाजाशी नाळ जोडण्याचा वारसा पुढे सुरू ठेवणे ही कौतुकास्पद बाब आहे.
तुळशीबागेत चित्रकलेचा रविवार साजरा व्हावा, अशी इच्छा मुरली लाहोटी यांनी प्रदर्शित केली. विवेक खटावकर यांनी प्रास्ताविकामध्ये प्रदर्शनामागची भूमिका स्पष्ट केली. नितीन पंडित यांनी स्वागत केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप इंगळे यांनी आभार मानले.