ज्ञानाचे भांडार असलेल्या ग्रंथांचे वाचन गांभीर्याने आणि डोळसपणाने झाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
राज्य सरकारचा मराठी विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते झाले. महापौर चंचला कोद्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत या वेळी व्यासपीठावर होते. बालगंधर्व रंगमंदिर आवारामध्ये रविवापर्यंत (९ फेब्रुवारी) सकाळी ९ ते रात्री ८ या वेळात खुले राहणार असून, या ग्रंथोत्सवामध्ये २० स्टॉल्सचा समावेश आहे.
यादव म्हणाले, शब्दांचा वापर जाणीवपूर्वक करायला हवा. उत्साहाच्या भरात काही वेळा चुकीचे शब्द वापरले जातात. कालांतराने ते शब्द रूढ होऊन जातात. त्यामुळे होणारे भाषेचे नुकसान टाळण्यासाठी शब्दांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे हे ग्रंथवाचनातून सिद्ध केले पाहिजे. त्यासाठी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मूळ संदर्भग्रंथांचे वाचन करणे आवश्यक आहे. मातृभाषा जोपासायची असेल तर अभ्यास आणि चिंतनाची गरज आहे. मराठी माणसांच्या भावभावनांचे चित्रण असलेले लेखन जगभरात वाचले जाईल. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्येच ग्रंथवाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुस्तके आणि चांगल्या विचारांनी मनाची मशागत होते, असे वैद्य यांनी सांगितले. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना कोद्रे यांनी व्यक्त केली. दिलीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वृषाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.