भारत तरुणांचा देश असल्याने उद्योग क्षेत्राचा विकास आणि उद्योगातून रोजगार असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. केंद्र सरकारने दोन हजार २८० कोटी रुपये स्वयंचलित औद्योगिक संशोधनासाठी नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अॅण्ड रिसर्च आर अॅण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर (नॅट्रीप) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु केला असल्याची माहिती, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली.
द अॅटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने (एआरएआय) भरवण्यात आलेल्या सिम्पोझीयम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०१५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि चाकण येथील द ऑटोमोटिव्ह रिसर्चच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन अनंत गीते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गीते यांनी ही माहिती दिली. गीते म्हणाले, की मिश्र तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहने पुढे यावीत यासाठी केंद्र सरकारने नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन तयार केला असून, त्यामध्ये सुरुवातीला १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इंधनसमस्येवर बोलताना गीते म्हणाले, ‘‘इंधनाची समस्या पूर्ण जगात आहे. त्याला पर्याय शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून विजेवर चालणारी तसेच इंधनाला पर्याय ठरेल अशा घटकांच्या सहकाऱ्याने चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच दुचाकी वाहनांच्या अपघात वाढले आहेत. त्यामुळे २०१७ पर्यंत तंत्रज्ञानाच्या साहायाने यापुढे दुचाकींची निर्मिती करताना, त्या दुचाकींना ‘अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम’ (एबीएस)प्रणाली बसविण्यात येईल. त्यामुळे अपघात टाळला जाणार आहे.’’
पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची दिलेली घोषणा खरी ठरवण्यासाठी सर्व विभाग काम करत आहेत. हे करत असताना, पर्यावरणाचा विचारही केला जात असून ग्रीन आणि क्लीन पर्यावरण असा संबंध जोडत औद्योगिक विकास साधला जाईल. आधीच्या सरकारने सुरु केलेला गोंदिया प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. रत्नागिरीमध्ये लवकरच पेपर मिल सुरु करण्यात येणार आहे. वाहन हा अत्यंत गरजेचा भाग झाला असून मंदीचा प्रभाव वाहनउद्योग क्षेत्रावर पडू शकत नाही, असेही या वेळी गीते यांनी सांगितले.

‘ज्योत से ज्योत जलाते चलो..’ या पंक्ती कोणाच्या? तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे ऐकाल, तर या संत ज्ञानेश्वरांच्या पंक्ती आहेत. इतकेच नव्हे, तर गीते साहेबांनी चक्क ज्ञानेश्वरांची क्षमा मागून ‘ज्योत से ज्योत जलाते चलो.. विकास की गंगा बहाते चलो’ असा नाराही दिला!