मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने जातात. वर्दळ वाढली तसे अपघातही वाढले आहेत, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथे बोलताना व्यक्त केली.
वाकड येथे महामार्गावरील ‘लाइफ पॉइन्ट’ या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, रुग्णालयाचे संस्थापक संचालक डॉ. सुरेश संघवी, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, नगरसेवक विनायक गायकवाड, उमा खापरे, डॉ. शोभा वाघमारे आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानासाठी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला.
मुखमंत्री म्हणाले, द्रुतगती महामार्गावर अशा प्रकारच्या रुग्णालयाची गरज होती. या मार्गावरून दररोज ६० हजारांहून अधिक वाहने जातात. त्यामुळे येथील वर्दळ कमालीची वाढली आहे. अलीकडे वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अपघातातील रुग्णांसाठी अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. या कालावधीत वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. मात्र, रुग्णालय दूर असल्यास रुग्णाच्या जीवाला नाहक धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील हे रुग्णालय अपघातग्रस्तांसाठी उपयुक्त ठरेल. खासगी रुग्णालयातूनही शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा, यासाठी रुग्णालयांनी प्रयत्नशील राहवे. बापट म्हणाले, कर्तव्य भावनेतून रुग्णांना सेवा द्यावी. पैशासाठी रुग्णांचे उपचार थांबवले जाणार नाहीत, अशी ग्वाही रुग्णालयाने दिली आहे, त्यानुसार, त्यांनी गरिबांना उपचार द्यावेत.