मराठे इन्फोटेकतर्फे ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरविण्यात येणाऱ्या ‘महाटेक २०१६’ या व्यावसायिक प्रदर्शनामध्ये तीनशेहून अधिक उद्योगांचा सहभाग असेल. ‘गो ग्लोबल’ हे या प्रदर्शनाचे ब्रीद असून ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
देशभरातील उद्योजकांना आपली बुद्धिमत्ता, आधुनिक विचारसरणी आणि आपल्या व्यवसायातील क्षमता वाढवून आधुनिकीकरणासाठीची कास धरण्यासाठी महाटेक हे योग्य व्यासपीठ असून या प्रदर्शनाचे हे १२ वे वर्ष असल्याची माहिती विनय मराठे यांनी मंगळवारी दिली. प्रक्रिया, उद्योग उपकरणे, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअिरग आणि मशीन टूल्स, तांत्रिक सेवा आणि सल्ला या चार विभागांमध्ये हे प्रदर्शन असेल. लघुउद्योजकांपासून ते आंतरराष्ट्रीय बँड्रपर्यंत किमान तीनशेहून उद्योजकांचा थेट सहभाग असून चार दिवसांत ३० ते ४० हजार उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे. आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून आफ्रिकन देशांतील राजदूत उद्योजकांशी थेट संवाद साधणार आहेत. इंटरनेट, अॅप, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमाचा उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे मराठे यांनी सांगितले.