गांधीजींची शिस्तीची, स्वच्छतेची शिकवण आचरणात आणून विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गांधीजींच्या स्मृतींना मंगळवारी अभिवादन केले. समाजातील विविध घटकांच्या सहभागाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महोत्सवाची मंगळवारपासून सुरुवात झाली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी महोत्सवाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पाटील म्हणाल्या, ‘‘आजच्या पिढीला गांधीजी अधिक चांगल्या पद्धतीने समजावून देण्याची गरज आहे. आजच्या पिढीला गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, विचार, अहिंसेचे तत्त्व माहीत नाहीत. देशाला फक्त गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी गांधीजी लढले नाहीत, तर देशाला आर्थिक आणि सामाजिक स्वतंत्र मिळावे हा त्यांचा उद्देश होता. गांधीजींने पाहिलेले भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या पिढीला गांधीजी समजावून देण्याची गरज आहे.’’
महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, निधीचे विश्वस्त अभय छाजेड, प्रा. एम. एस. जाधव, डॉ. माधव रत्नपारखी, निधीच्या ग्रंथालय समितीच्या सचीव डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. अन्वर राजन उपस्थित होते.