आमदार, खासदार व मंत्र्यांमध्ये रंगलेली टोलेबाजी, एकमेकांना काढलेले चिमटे, मावळ मतदारसंघावरून झालेल्या कोटय़ा व त्यातून उडालेले हास्याचे फटाके यामुळे माथेरान महोत्सवात चांगलीच रंगत भरली. पिंपरी-चिंचवड शहरवासियांना माथेरानमध्ये येऊन तेथील नयनरम्य पर्यटनस्थळाचे सौंदर्य अनुभवण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले. शहर वाढले, लोकसंख्या वाढली की त्याचे फायदे तितकेच तोटेही असतात, असे मत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी चिंचवड येथे मांडले.
माथेरान प्रतिष्ठान, भिकू वाघेरे प्रतिष्ठान, जय गोिवदा ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माथेरान महोत्सवाचे उद्घाटन तटकरेंच्या हस्ते झाले. महापौर मोहिनी लांडे अध्यक्षस्थानी होत्या. खासदार गजानन बाबर, आमदार विलास लांडे, सुरेश लाड, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, गटनेते कैलास कदम, अमर साबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, संतोष पवार आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी दिलीप गुप्तांना माथेरान भूषण तर संजोग वाघेरे, नीलमकुमार खैरे, नितीन नाणेकर, विजय काटेंना माथेरान मित्र म्हणून गौरवण्यात आले.
तटकरे म्हणाले, देशातील सर्वोत्तम महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. येथील वेगवान विकासकामांमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. उद्योगधंदे वाढले की चांगले वाईट परिणाम दिसू लागतात. मात्र, द्रष्टे नेतृत्व असल्यास विकासाला दिशा मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्षम नेतृत्व शहराला लाभले आहे. शहराचे काही प्रश्न आहेत. मात्र, ते सोडण्यासाठी अजितदादा समर्थ आहेत, असे ते म्हणाले. यावेळी महापौर, गजानन बाबर, विलास लांडे, सुरेश लाड, भाऊसाहेब भोईर, संतोष पवार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले.