‘भारत आणि चीन या दोन्ही देशांची प्रगती एकमेकांवर अवलंबून आहे, हे समजून घेऊन दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी केले. ‘भारतात शिया मुस्लीम सुरक्षित आहेत, तेवढे ते पाकिस्तानमध्येही सुरक्षित राहू शकले नाहीत, असा उल्लेखही त्यांनी केला.
 चाणक्य मंडल परिवाराच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात दलाई लामा बोलत होते. या वेळी चाणक्यचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, पूर्णा धर्माधिकारी, भीष्मराज बाम, डॉ. भूषण केळकर, अनंत गोगटे, माधव जोगळेकर आदी उपस्थित होते. यानिमित्ताने ‘धर्मनिरपेक्ष तत्त्वे’ या विषयावर जाहीर संवादही आयोजित करण्यात आला होता.
या वेळी दलाई लामा म्हणाले, ‘‘भारत आणि चीन या दोन्ही देशांची प्रगती एकमेकांवर अवलंबून आहे याची जाणीव दोन्ही देशांनी ठेवणे गरजेचे आहे. परस्पर संबंध अधिक चांगले होण्यासाठी या दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यातील अडचणी सोडवण्यासाठीही दोन्ही देशांनी प्रयत्न करायला हवेत. आर्थिक उदारीकरणाच्या चीनच्या धोरणाने तिबेटी संस्कृतीही स्वीकारली आहे, मात्र चीनच्या इतर भागांतील लोकांना जे अधिकार मिळतात ते तिबेटलाही मिळावेत. तिबेटची निष्ठा चीन धाकाने मिळवू शकत नाही.’’
जगातील सर्व लोकशाही देशांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे, असे सांगून लामा म्हणाले, ‘सध्या जागतिक पातळीवर सगळीकडेच थोडी गोंधळाची परिस्थिती आहे. या परिस्थितीत जागतिक शांततेसाठी सर्व देशांनी एकमेकांच्या सहकार्याने पुढे जायला हवे. त्यासाठी सगळय़ांनीच आपली सहनशक्ती वाढवायला हवी. जगात मानवता, शांतता ही तत्त्वे टिकवून ठेवण्यात प्रत्येकाची काही जबाबदारी आहे. ती वैश्विक पातळीवरील जबाबदारी आहे, याची जाणीव सर्वानीच ठेवणे आवश्यक आहे. कोणताही एक धर्म जगावर कधीच राज्य करू शकणार नाही. सगळय़ाच धर्मानी एकमेकांप्रति सहिष्णुता दाखवणे आवश्यक आहे.’’