आकर्षक लेझर अॅक्ट.. नंदिनी गुजर यांचे कर्नाटक शैलीतील गायन.. ‘जाणता राजा’ या महानाटय़ातील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग.. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सादर केलेली गणेश वंदना.. शांतता आणि सद्भावना हा संदेश देणारा सरहद संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा नृत्याविष्कार.. ऊर्मिला मातोंडकर, ईशा कोप्पीकर यांच्यासह मराठी अभिनेत्रींनी ढोलकीच्या तालावरील दिलखेचक अदा.. अशा मेजवानीने रौप्यमहोत्सवी पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी उद्घाटन झाले.
सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, फेस्टिव्हलचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी, संयोजक कृष्णकांत कुदळे, उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज, अभिनेत्री डिम्पल कपाडिया, समीरा रेड्डी, कंगना राणावत, अभिनेते रणधीर कपूर, राजीव कपूर, सुनील शेट्टी, चंकी पांडे, मीरा कलमाडी, उपमहापौर बंडू गायकवाड, अिजक्य डी. वाय. पाटील, प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, इटलीचे राजदूत डॅनिअल मॅन्सिनी, बांग्लादेशचे राजदूत तारिक अन्वर या वेळी उपस्थित होते.
कर्नाटक शैलीचे ज्येष्ठ गायक पं. बालमुरली कृष्ण, लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंह, बैलगाडा शर्यतीचे आयोजक ज्ञानोबा लांडगे आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे संयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. शताब्दी पार केलेल्या लष्कर परिसरातील श्रीपाद सार्वजनिक गणेश मंडळास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे प्रतापराव गोडसे स्मृती जय गणेश पुरस्काराने गौरविण्यात आले.
छगन भुजबळ म्हणाले, सामाजिक ऐक्य आणि राजकीय जागृतीसाठी लोकमान्यांनी गणपती उत्सव सार्वजनिक केला. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून या उत्सवास आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त करून देण्याचे काम कलमाडी यांनी केले. सलग २५ वर्षे फेस्टिव्हल सुरू ठेवताना अडचणी आणि संकटे येतात. पण, ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत हे सुरू ठेवले पाहिजे.
सलग दुसऱ्या वर्षी महापौरांची अनुपस्थिती
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमास महापौरांची अनुपस्थिती हा योग सलग दुसऱ्या वर्षी जुळून आला. गेल्या वर्षी छगन भुजबळ यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे शेवटच्या क्षणी महापौर वैशाली बनकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनुपस्थित होते. यंदा महापालिकेच्या शनिवारवाडा महोत्सवाच्या उद्घाटनामुळे महापौर चंचला कोद्रे फेस्टिव्हलला उपस्थित राहू शकल्या नाहीत. पुणे फेस्टिव्हलच्या जाहिरातींमधून महापौरांचे नाव वगळण्यात आल्यामुळेच कोद्रे अनुपस्थित असल्याची चर्चा होती. तर, महापालिकेचा महोत्सव असतानाही आयुक्त महेश पाठक पुणे फेस्टिव्हलला उपस्थित होते.