शहरातील वाहतूक बदल, पोलीस अधिकारी आणि ठाण्याचे क्रमांक, पत्ता, नियम तोडल्यानंतर भरावयाच्या दंडाची माहिती, आपत्कालीन क्रमांक, वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर पर्यायी रस्ते अशी सर्व माहिती आता पुण्यातील नागरिकांना त्यांच्या खिशात उपलब्ध होणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी या सर्व माहितीचे एक मराठी आणि इंग्रजीत असलेले अॅप्लिकेशन तयार केले आहे. राज्यात वाहतूक पोलिसांनी तयार केलेले हे पहिले अॅप असून यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पुणे वाहतूक शाखेच्या वतीने ‘पुणे ट्रॅफिक अॅप’  बरोबरच पोलीस अधिकाऱ्यांसाठी तयार केलेल्या अॅपचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. या वेळी सहपोलीस आयुक्त संजयकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते. नागरिकांना वाहतूक विषयक माहिती, सेवा आणि सुविधा हातातील मोबाईलवर तत्काळ मिळावी, नागरिकांना वाहतूकचे नियम, दंड, अनामत रक्कम, वाहतूक कोंडीची परिस्थिती, पोलिसांची संकेतस्थळे या सर्वाची माहिती मिळावी म्हणून हे ‘अॅप’ तयार करण्यात आले आहे.
शहरात वाहतूक ही सर्वात मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले असून ‘गुगल प्ले, अॅप स्टोअर’ हे सर्वाना डाऊनलोड करून घेता येईल. या अॅपमध्ये वेगवेगळी फिचर्स आहेत. वाहतूक शाखेची आणि शहर पोलिसांची माहिती, पोलीस ठाण्याचे क्रमांक, नियम मोडल्यास भरावयाची दंडाची रक्कम, वाहन नो पार्कीगमध्ये उभे केल्यानंतर ते कोणत्या ठिकाणी नेले आहे, वाहतूक कोंडीत अडकला तर पर्यायी रस्ते दाखविणारे फिचर, वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाबाबत दिलेल्या सूचना आणि पर्यायी रस्ते, विविध रुग्णालयांचे क्रमांक, आपत्कालीन क्रमांक, पोलिसांसंदर्भातील वेगवेगळ्या लिंक, अॉटो रिक्षाचे भाडे, रोड सेफ्टी टिप्स्, सूचना आणि प्रश्न विचारण्यासाठी एक फिचर देण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहूतक शाखेच्या उपक्रमाचे फोटे आणि काही व्हिडीओ यामध्ये उपलब्ध असतील. या अॅपमध्ये दिलेलय़ा सर्व क्रमांकावरून थेट फोन लावता येणार आहेत. तुम्हाला जवळच्या पोलीस ठाण्याकडे जाण्यासाठी रस्ता दाखविणारे फिचर सुद्धा या अॅपमध्ये देण्यात आले आहे. यामध्ये आणखी सुधारणा केल्या जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त पांढरे यांनी सांगितले.
 *************************************************
वाहतूक पोलिसांनी अधिकाऱ्यांसाठी ट्रॅफी कॉप सारखे आणखी एक अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये साडेतीन लाख वाहनांचा डेटा भरण्यात आला आहे. एखाद्या संशयित वाहनाचा क्रमांक या अॅपमध्ये टाकल्यानंतर त्या वाहनाची सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ मिळेल. त्या बरोबरच एखाद्या वाहनाने पूर्वी वाहतुकीचे नियम तोडले असतील तर त्याची माहिती, त्याचा क्रमांक या अॅपमध्ये टाकल्यानंतर समजते. त्यानुसार त्या वाहनाला जास्त दंड करणे शक्य होईल. या अॅपमध्ये वाहनांच्या क्रमांकाबरोबरच वाहन चालविण्याच्या परवान्याचा क्रमांक टाकण्यात आला आहे. सध्या हे अॅप प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पुढील काळात चोरीच्या वाहनांचे सर्व क्रमांक टाकले जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
 ********************************************
एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहन परवाना जप्त करून त्याचा खटला न्यायालयात पाठविला जातो. त्या व्यक्तीने न्यायालयात जाऊन दंड भरून परवाना परत मिळवणे अपेक्षित असते. मात्र, न्यायालयात जाण्याऐवजी बरेचजण आरटीओमध्ये जाऊन दुसराच परवाना काढतात. त्यामुळे न्यायालयात अनेक वाहन परवाने पडून आहेत. या गोष्टीला आळा बसावा म्हणून न्यायालयात पाठविण्यात आलेल्या वाहन परवान्याची माहिती एका लिंकवर टाकली आहे. ही लिंक आरटीओला देण्यात आली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती दुसऱ्यांदा वाहन परवाना काढण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड होईल, असे पांढरे यांनी सांगितले.