भाजप-राष्ट्रवादीची ‘सलगी’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पवारांनी हातात झाडू घेतले, त्यावरून टीकाटिप्पणी सुरू असतानाच माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, अटलजींनी इंदिरा गांधी यांचे कौतुक केले, तेव्हा भाजप, काँग्रेसचे विलीनीकरण झाले होते का, असा मुद्दा रविवारी निगडीत बोलताना उपस्थित केला. आमची सत्ता असताना उठसूठ आंदोलने करणारे ‘स्वाभिमानी’ नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता मौन का बाळगून आहेत, असा प्रश्नही त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना उद्देशून विचारला.
पिंपरी महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शहरात एकाच वेळी सहा ठिकाणी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्यात आले, त्याचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते भक्ती-शक्ती शिल्पसमूहाजवळ झाला. खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या वेळी पवार म्हणाले,की एखादा चांगला कार्यक्रम असल्यास टीका कशासाठी करायची, विरोधासाठी विरोधाचे राजकारण आपण करणार नाही. कालचे विरोधक आज सत्तेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कापूस, ऊस, दूध, सोयाबीन उत्पादक शेतक री अडचणीत आहे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. गेल्या वेळेपेक्षा उसाला जास्तीचा दर मिळाला पाहिजे. केंद्र व राज्यसरकारने या प्रश्नात हस्तक्षेप करावा. आमची सत्ता असताना उठसूट आंदोलने करणारे स्वाभिमाने नेते आता मौन बाळगून आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कचरा डेपोचा निर्णय नागरिकांना विश्वासात घेऊनच
मोशीत पुण्याचा कचरा टाकण्याच्या प्रस्तावास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्याचप्रमाणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, भाजप नेते एकनाथ पवार आदींचा विरोध आहे. त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता कचरा डेपोची कृती होता कामा नये, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली.