किलरेस्कर आणि क्लब वसुंधरा यांच्यातर्फे आयोजित ९ व्या किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५ देशांतील १४० लघुपट पाहण्याची पर्वणी लाभणार आहे. पर्यावरणविषयक प्रश्नांचा परामर्श घेणारा हा महोत्सव शुक्रवारपासून (१६ जानेवारी) २३ जानेवारी या कालावधीत होत असून ‘शून्य कचरा : सुरुवात स्वत:पासून’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे १६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक कल्याण वर्मा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ‘द कार्बन रश’ या लघुपटाने महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात लघुपट आणि छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी (१७ जानेवारी) घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालन येथे सायंकाळी सहा वाजता किलरेस्कर वसुंधरा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘माय एनकाउंटर विथ कॅमेरा’ या विषयावर कल्याण वर्मा यांचे दृक-श्राव्य सादरीकरण होणार आहे. महोत्सवात कोलकाता येथील छायाचित्रकार ध्रतीमान मुखर्जी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन २२ जानेवारी रोजी पाहण्याची संधी मिळणार असून पुण्यातील छायाचित्रकारांना त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधता येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे २३ जानेवारी रोजी अतुल किलरेस्कर यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचा समारोप होणार असून त्यांच्या हस्ते ‘किलरेस्कर वसुंधरा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.