पिंपरी महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त राजीव जाधव यांनी गुरूवारी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यम व लघुउद्योजकांसाठी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हायब्रंट एसएमई २०१६’ चे उद्घाटन केंद्र सरकारच्या लघु व मध्यम विभागाचे संचालक आर. बी. गुप्ते यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी उपसंचालक अभय दप्तरदार, अनिल मित्तल, अप्पासाहेब शिंदे, अभय िखवसरा, नितेश मकवाना, दिलीप मॅथ्यू, आशा पाचपांडे, मोतीलाल सांकला, राजीव दशपुते आदी उपस्थित होते. या उपक्रमात २३ विविध प्रकारच्या उद्योगांमधील १५० प्रदर्शकांनी आपली उत्पादने सादर केली आहेत. आयुक्त म्हणाले,‘‘ पिंंपरी-चिंचवड ऑटो आणि आयटी हब असून येथील लघुउद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी १५ दिवसात बैठक लावू आणि ते प्रश्न सोडवू. उद्योजकांनी ‘सीएसआर’ फंडातून स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आदी कामांसाठी पैसे खर्च करावेत.’’ प्रास्ताविक अप्पा शिंदे यांनी केले. अनिल मित्तल यांनी स्वागत केले. नितेश मकवाना यांनी आभार मानले.