हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी असे समीकरण रूढ होत आहे. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा प्रतिगामी ठरवला जातो. हा तर पुरोगाम्यांचा  दहशतवाद आहे, अशा शब्दांत चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत  प्रा. शेषराव मोरे यांनी पुरोगाम्यांवर टीकास्त्र सोडले.
पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि ऑफबीट डेस्टिनेशन्स यांच्यातर्फे आयोजित चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे, मुंबईच्या महापौर स्न्ोहल आंबेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, उपाध्यक्ष भालचंद्र िशदे, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, शेषराव मोरे यांच्या पत्नी निर्मला मोरे, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ पाटील, सचिव अरिवद पाटील या वेळी उपस्थित होते.
हा पुरोगामी आणि तो प्रतिगामी, हा डावा आणि तो उजवा असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत पुरोगाम्यांनीच प्रचलित केली असल्याकडे लक्ष वेधून मोरे म्हणाले,‘ हिंदू शब्दाचा वापर करून आपण प्रतिगामी किंवा जातीयवादी तर ठरणार नाही ना, या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता वावरत आहे. हा एक प्रकारचा पुरोगामी दहशतवाद असून त्याने मराठी वैचारिकतेला घट्ट विळखा घातला आहे. या पोथीनिष्ठ मार्क्सवादी पुरोगाम्यांनी भारतातील वैचारिकतेचे पुरते वाटोळे केले आहे.’
‘अंदमान हे स्वातंत्र्ययुद्धाचे तीर्थक्षेत्र आहे. सावरकर यांच्यासारखा प्रखर बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ देशात सापडणार नाही. दाभोलकरांचे काम हा सावरकरांच्या कार्याचा पुढचा टप्पा होता. बिगरमुस्लीम ते हिंदू ही सावरकरांच्या हिंदुत्वाची संकल्पना आहे. हिंदुत्व ही धार्मिक संकल्पना नाही, तर हिंदू लोकांचे एकत्व म्हणजे हिंदुत्व हे सावरकरांना अभिप्रेत होते,’ असेही मोरे यांनी सांगितले.
‘सावरकर साहित्यिक आणि राजकारणी होते. साहित्याची उंची गाठण्याचा प्रयत्न साहित्यिकांनी करावा. आम्ही राजकारणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न करू,’ असे ठाकरे यांनी सांगितले. अंदमानाच्या सेल्युलर जेलमधील सावरकरांची वचने काढणाऱ्याला कोलूला जोडून दोन चाबकाचे फटके मारावेत, असे विधान करीत  त्यांनी, अहिंसा मुळावर येणार असेल तर, विधायक हिंसेचा मार्ग अनुसरावा,’ हे सावरकरांकडूनच शिकलो असल्याचे सांगितले.
अनंत गीते, डॉ. माधवी वैद्य यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. गणेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

‘सावरकरांचे नाणे प्रकाशित करावे’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे त्यांची प्रतिमा असलेली नाणी प्रकाशित केली जाणार आहेत. त्याच धर्तीवर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असलेले विशेष नाणे प्रकाशित करण्याची मागणी शेवाळे यांनी गीते यांच्याकडे केली. अंदमानमध्ये सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक झाल्यास ते संमेलनाचे फलित ठरेल, असेही त्यांनी सांगितले.