‘ॐ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’ ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची रचना गानसम्राज्ञी लतादीदींच्या स्वरांचे कोंदण घेऊन आली आणि हे अमृतस्वर साठवीत रसिकांची नव्या वर्षांरंभीची सायंकाळ संस्मरणीय ठरली. गायत्रीमंत्राच्या उच्चारणाने लतादीदींनी आपल्या छोटेखानी मनोगताची सांगता केली आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना देण्यात आली.
माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्रातर्फे लोणी येथे साकारण्यात आलेल्या विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ, शुभलक्ष्मी खाँ, ज्येष्ठ ध्रुपदगायक उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मीना खडीकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, प्रा. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अण्णा डांगे, डॉ. विश्वनाथ कराड, ज्योती ढाकणे, राहुल कराड या प्रसंगी उपस्थित होते.
लता मंगेशकर म्हणाल्या, संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी उभारलेली ही वास्तू, डॉ. विश्वनाथ कराड आणि आदिनाथ यांनी सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी मी येथे आले. येथील वातावरण, वास्तू आणि भव्य सत्कार यामुळे मी भारावून गेले आहे.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, लतादीदींची ओळख करून घ्यायची असेल तर ती केवळ गाण्यातून होणार नाही. तर, आपल्याला त्यांचे वागणं, बोलणं, शब्द यातून ती ओळख करून घ्यावी लागेल.
ही संस्था संगीत जगतामध्ये मोठे योगदान देईल, अशी भावना उस्ताद अमजद अली खाँ यांनी व्यक्त केली. परदेशी विद्यार्थी येथील कला, संगीत आणि परंपरेचे शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यापीठांमध्ये येतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश महान होईल, असे डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. डॉ. विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. आदिनाथ मंगेशकर यांनी अकादमीची माहिती दिली. सुधीर गाडगीळ आणि पं. किशन शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती ढाकणे यांनी आभार मानले.