लहान मुलांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेत वीस मुला-मुलींची पालकांशी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील आठशे मुले-मुली बेपत्ता असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबविण्यात आली. पुणे पोलीस आयुक्तालयातही १ ते ३१ जुलै दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाण, मंदिर, चौक अशा ठिकाणांची पाहणी करून आढळलेल्या लहान मुलांचे समुपदेशन केले. त्याचप्रमाणे शिवाजीनगर निरीक्षणगृहातील मुलांशी संवाद साधून तेथील १६ मुलांची माहिती घेऊन त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात आला, तर काही मुले रेल्वे स्थानकावरही आढळून आली. पालकांची भेट घडवून आणलेली सोळापैकी ९ मुले ही परराज्यातील होती. त्या ठिकाणी अपहरणाचे गुन्हे दाखल असल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कानमध्ये पुणे पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच, पुण्यातून हरवलेली काही मुले मिळाल्याची माहिती बाहेरच्या राज्यातील पोलिसांनी दिली आहे. त्या पोलिसांची पथके पुण्यात येऊन गेली आहेत, अशी माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हरवलेल्या मुला-मुलींची नोंद आहे. त्यानुसार शहरात एक हजार ७९ मुले-मुली बेपत्ता होते. ऑपरेशन मुस्कानमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व स्थानिक पोलिसांनी हरवलेल्या मुला-मुलींच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. त्यावेळी १०५ मुले व १७१ मुली अशी २७६ मुले-मुली घरी परत आल्याचे आढळून आले. मात्र, शहरात अद्यापही २०१० पासूनची ८०१ मुले-मुली बेपत्ता आहेत. त्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हरवलेली मुले शोधण्याची मोहीम सुरूच ठेवणार
ऑपरेशन मुस्कान एक महिन्यापुरते होते. मात्र, त्याला पुण्यात मिळालेला प्रतिसाद पाहून नाव बदलून ही मुले-मुली शोधण्याची मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या परिपत्रकानुसार १८ वर्षांखाली मुले-मुली हरवल्यानंतर थेट अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. पुण्यात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये गांभीर्याने तपास केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.