‘सीरम’चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांचे मत

पुणे : लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याकडे न पाहता आणि जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेले लसीकरणाचे प्राधान्यक्रम दुर्लक्षित करुन सर्वाच्या लसीकरणाची घाई करणे, हीच भारताच्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील चूक असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी स्पष्ट के ले.

लसीकरण आणि करोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमाबाबत डॉ. सुरेश जाधव यांनी एका खासगी संस्थेच्या दूरचित्रसंवादात सहभाग घेतला होता. या वेळी डॉ. जाधव यांनी भारतातील लसीकरण मोहिमेतील त्रुटींवर बोट ठेवले.

डॉ. जाधव म्हणाले,की जागतिक आरोग्य संघटना एखाद्या रोगाची साथ जाहीर करते त्या वेळी त्याचे गांभीर्य ओळखून पावले उचलणे महत्त्वाचे असते. लसीकरण करताना सर्वात आधी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी अशी आरोग्य सेवकांची फळी आणि त्याखालोखाल देशाचे कामकाज सुरळीत ठेवणाऱ्या सर्व प्रशासकीय आघाडय़ांवरील कर्मचारी अर्थात फ्रं टलाईन वर्क र यांचे लसीकरण प्राधान्याने के ले जाणे आवश्यक आहे.

देशात लसीकरण मोहीम सुरू के ली त्या वेळी या गटाचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी लशींचा पुरेसा साठाही उपलब्ध होता. मात्र, त्यानंतर लसीकरण मोहिमेत सर्व वयोगटांचा अंतर्भाव करताना उपलब्ध लस साठय़ाकडे बघितले गेले नाही. देशातील तब्बल ५० टक्के  आरोग्य सेवक आणि इतर आघाडय़ांवरील कर्मचारी लसीकरणापासून वंचित असताना कितीही मोठय़ा लोकसंख्येचे लसीकरण के ले तरी त्याचे महत्त्व नाही, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट के ले.

डॉ. जाधव म्हणाले,की आपत्कालीन परवानगी देताना सर्व उत्पादक कं पन्यांच्या लशीच्या दोन मात्रांमध्ये चार आठवडय़ांचे अंतर निश्चित करण्यात आले होते. लसीकरण पार पडत गेले तसे हाती येणाऱ्या अहवालांनुरूप हे अंतर वाढवण्यात आले. भारत सरकारने नुकतेच दोन मात्रांमध्ये १२ आठवडय़ांचे अंतर निश्चित के ले आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकसंख्येला पहिली मात्रा लवकरात लवकर मिळेल आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ताज्या अहवालांप्रमाणे दोन मात्रांमधील अंतर वाढवल्यास अधिक संरक्षणही मिळू शकेल.

बेफिकिरी भोवली : करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आणि आपण बेफिकीर झालो. करोना संपला असे मानून सर्व प्रकारचे उत्सव, सण, समारंभ साजरे करण्यास एकत्र आलो. ही बेफिकिरी भोवल्यामुळेच अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ दुसऱ्या लाटेदरम्यान आल्याचेही डॉ. जाधव म्हणाले.