संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची (यूपीए) शेतकरीविरोधी धोरणे सध्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए) मागील पानावरून पुढे सुरू ठेवणार असेल तर, या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा आणि बटाटा विकण्यास परवानगी दिली याबद्दल सरकारचे स्वागतच आहे. शेतक ऱ्याला आपला माल कोठे विकायचा याचे स्वातंत्र्य हवे, असे सांगून राजू शेट्टी म्हणाले, महागाईचे संकट आले तेव्हा शेतकरी हेच बळी ठरतात. त्यामुळे चार पैसे मिळण्याची शेतक ऱ्यांची संधी हिरावून घेणे योग्य ठरणार नाही. कृषी आधारभूत दरासंदर्भात मागील सरकारने घाईघाईने शिफारसी केल्या होत्या. त्याचे आकलन न करताच सध्याच्या सरकारने या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारल्या आहेत. कापूस आणि भाताला ५० रुपये वाढविले. तर, सोयाबीन, भुईमूग आणि मका याच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. एकीकडे उत्पादन खर्चात १६ टक्के वाढ होत असताना सर्व मिळून दिलेली वाढ ही केवळ २ टक्के आहे. यामागचे अर्थशास्त्र काय हे स्पष्ट करावे, अशा शब्दांत संघटनेने पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना आपल्या भावना पत्राद्वारे कळविल्या आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त शेतक ऱ्याचा बळी का देता, हा आमचा सवाल आहे. यामध्ये दुरुस्ती होणार नसेल तर, संघटनेला रस्त्यावर येण्याखेरीज पर्याय नाही. काँग्रस सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळेच महाराष्ट्रात एनडीएला यश मिळाले.
विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात भाजप-शिवसेनेमध्येच तणाव सुरू आहे. त्यांचा तोडगा निघाल्यावर आमच्या जागांवर निर्णय होणार आहे. लवकर जागावाटप झाल्यामुळेच लोकसभेला यश मिळाले. मात्र, त्याला वेळ लावला तर लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करणे अवघड होईल. राज्यामध्ये जनमत सरकारविरोधात असले तरी वर्षांनुवर्षे सत्ता ताब्यात असलेली घराणी हे आव्हान आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. जिल्ह्य़ामध्ये बारामती, दौंेड, इंदापूर, शिरुर आणि आंबेगाव या पाच जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवू इच्छिते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सहकार बचाओ परिषद
भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे महाराष्ट्रामध्ये सहकार रसातळाला गेला आहे. साखर कारखान्यांची परिस्थिती चांगली नाही. काही कारखाने कर्जबाजारी, तर काही दिवाळखोरीत निघाले आहेत. दूध संघ, गिरण्या, बाजार समिती यांची अवस्था तशीच आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ९ ऑगस्ट रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सहकार बचाओ परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.