खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या मात्र करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना तातडीने घरी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्ण खासगी रुग्णालयात आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे न दिसणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या प्रकारच्या रुग्णांमुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांना खासगी रुग्णालयात प्रवेश दिला जात नाही. खाटा उपलब्ध नसल्याचे कारण रुग्णालयांच्या व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अस्वस्थ रुग्णांना उपचार मिळत नसून त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहेत. तशा तक्रारी नागरिकांकडून सातत्याने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे आदेश दिले आहेत. करोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठविण्यात यावे. रुग्ण घरी जाण्यास नकार देत असतील तर त्यांची यादी तयार करून ती महापालिका प्रशासनाला द्यावी, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमधील करोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फत रुग्णालयांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेताना आढळून आले तर रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात ३ हजार ५०४ खाटा उपलब्ध

महापालिकेच्या ताब्यात सध्या ३ हजार ५०४ खाटा आहेत. महापालिकेच्या ताब्यात खासगी रुग्णालयातील एकूण २ हजार ४८६ खाटा होत्या. खासगी रुग्णालयातील खाटांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन देण्याची सुविधा नसलेल्या ९१२ खाटा होत्या. ऑक्सिजन नसलेल्या खाटांमध्ये १२५ खाटा वाढविण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनजी सुविधा असलेल्या खाटा १६२ होत्या त्यामध्ये ७६९ खाटांची वाढ करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरची सुविधा  नसलेल्या १३२ खाटा होत्या. त्यामध्ये ७६ खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या १७७ खाटांच्या क्षमतेमध्ये ८० खाटांनी वाढ करण्यात आली आहे.

पहिल्या ऑनलाइन सभेतही तीव्र पडसाद

खासगी रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभेतही उमटले. महापालिकेची जुलै महिन्याची मुख्य सभा दूरचित्रसंवाद (व्हिडिओ कॉन्फरसिंग) माध्यमातून झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी सभा झाली. नगरसेवक ऑनलाइन पद्धतीने सभेत बोलले. त्यावेळी नगरसेवकांनी खासगी रुग्णालयाच्या कारभार आणि प्रशासनावर टीका केली. करोना संकट असताना डॅशबोर्डवर खाटा उपलब्ध दिसतात, मात्र रुग्णांना खाटा मिळत नाहीत. रुग्णालयांवर कारवाई करून उपयोग होणार नाही. आरोग्य सुविधा देण्यात महापालिका कमी पडत आहे, खासगी रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, त्याची माहिती देण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केली.