देशातील ऑर्डीनन्स फॅक्टरीचे सरकारकडून खासगीकरण होत असल्याच्या निषेधार्थ मागील पाच दिवसापासून कर्मचारी संपावर होते. या संपाच्या पार्श्‍वभूमीवर आज संरक्षण उत्पादन सचिव आणि कर्मचारी संघटना यांच्या दरम्यान सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीनंतर कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला असून सोमवारपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्यामाहितीनुसार,एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी १४ ऑगस्टपासून चर्चा सुरू होती.

आज पुन्हा संरक्षण उत्पादन सचिव आणि कर्मचारी संघटना यांच्यात पुन्हा बैठक झाली. त्यावेळी आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण झाल्यास होणाऱ्या लाभा बाबतही चर्चा झाली. तसेच याच दरम्यान आयुध कारखान्याचे खासगीकरण करण्यापूर्वी सरकारची उच्च स्तरीय समिती कर्मचारी संघटनांशी चर्चा करेल असा निर्णय या बैठकीत झाला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी सोमवार २६ ऑगस्टपासून कामावर रुजू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.