पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे कट्टे हे पुण्याचे आगळे वैशिष्टय़ आहे. असाच अनोखा कट्टा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भरतो. बागकामाची आवड असलेले आणि घराच्या गच्चीवर बागकामाचा छंद जोपासणारे या कट्टय़ावर एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतात. ‘ऑरगॅनिक गार्डनिंग ग्रुप’तर्फे सदाशिव पेठ येथील रहाळकर राम मंदिरात हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

दिगंबर उगावकर आणि आशा उगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांपूर्वी आम्ही महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेचा सेंद्रिय परसबाग वर्ग अभ्यासक्रम केला. त्याद्वारे कचरा कसा जिरवायचा, त्याचे गांडूळखत करून घरच्या घरी बाग कशी करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली. ही कल्पना मला स्वत:ला खूप आवडली. आमचे मंगल कार्यालय आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे आमच्याकडे  होणारा रोजचा दहा किलो ओला कचरा जिरवून गच्चीत बाग केली आहे. पाच किलो खरकटे जिरवून त्याचे कंपोस्ट खत तयार करतो. त्यासाठी आम्हाला पुणे महापालिकेचा स्वच्छ  पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती ऑरगॅनिक गार्डनिंग ग्रुपचे आमोद रहाळकर यांनी दिली.

‘तुम्ही ग्रुप तयार करा. महिन्यातून एकदा भेटा आणि रोपे, बिया यांची देवाणघेवाण करून एकमेकांना प्रयोग सांगा’, असे उगावकर यांनी सुचविल्याप्रमाणे आम्ही व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्यावर बागकाम संदर्भात चर्चा, प्रश्नोत्तरे एवढीच चर्चा होत असते. पूर्वी इंद्रधनुष्य सभागृह येथे कट्टे घेत होतो. मधमाश्या, फु लपाखरे ,कमळे, गांडूळ खत कसे करावे, पालेभाज्या, गच्चीतील फळबाग, ड्रीपवर स्प्रिंकलर घरच्या घरी कसे करावे , सेंद्रिय कीटकनाशके अशा बागकामाविषयी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती. आता विषयच संपल्यामुळे आम्ही केवळ भेटून रोपे, बिया यांची देवाणघेवाण करतो. प्रदीप बोडस, हर्षद गोखले, स्नेहल गोखले, प्रद्युम्न गोगटे, सुचित्रा दिवाण, शिरीष दिवाण, प्रचिती गुर्जर, रोहिणी देढे आणि मोहन देढे असे या ग्रुपचे सक्रिय सदस्य आहेत, असे रहाळकर यांनी सांगितले. रविवारी (२४ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता भरणारा हा कट्टा नागरिकांसाठी खुला आहे.

पुस्तक कट्टा

आमच्या ग्रुपतर्फे ‘पुस्तक कट्टा’ ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. सर्वानी गोल करून बसायचे, मधोमध बागकामविषयक सर्व पुस्तके ठेवली जातात. सदस्यांनी आपल्याला हवे ते पुस्तक चाळायचे. नगरकर काका यांच्यासह देणगीदारांनी दिलेल्या पुस्तकांचा लाभ येथे घेता येतो. या ग्रंथालयातील पुस्तके सदस्य बदलून घेऊ शकतात, असे आमोद रहाळकर यांनी सांगितले.