पुणे : फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत सादरीकरणासाठी विषय निवडण्यावर घालण्यात आलेले निर्बंध आयोजकांनी अखेर हटवले.

विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करताना कोणते विषय मांडू नयेत, याची यादीच आयोजकांनी दिल्यानंतर महाविद्यालयीन वर्तरुळात ओळख असलेली फिरोदिया करंडक स्पर्धा यंदा वादात सापडली. रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शाह, अमोल पालेकर, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर आदी दिग्गजांनी ‘लोकसत्ता’त याबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर आयोजकांनी माघार घेत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. सादरीकरणाची संहिता विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे ‘सेन्सॉर’संमत करून घ्यावी लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.  ‘आयोजकांच्या हेतूंवर शंका घेण्यात आली.कोणत्याही प्रकारे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कोणताही विचार आमच्या मनात नव्हता आणि कधीही नसेल. फिरोदिया करंडक स्पर्धा कायमच अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पुरस्कर्ती आहे आणि यापुढेही राहील. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये ज्या प्रकारे विषय हाताळला जातो आहे हे अत्यंत खेदजनक आहे. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही जाहीर करू इच्छितो की, फिरोदिया करंडक स्पर्धा २०२०च्या नियमावलीत नमूद केलेल्या विषय निवडीबाबतचे सर्व निर्बंध आम्ही त्वरित मागे घेत आहोत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांवर आम्ही आजपर्यंत कुठलेही निर्बंध घातले नव्हते. परंतु एकूण विषयाची तीव्रता लक्षात घेता आता यापुढे प्रयोग सादर करण्याआधी नियमानुसार संघांनी नाटकाच्या संहितेबाबत सेन्सॉर मंडळाची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांना प्रयोगाची परवानगी दिली जाईल आणि या संदर्भातील कुठलीही जबाबदारी संयोजकांची नसेल,’ असे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

आयोजक म्हणतात..

फिरोदिया करंडक स्पर्धेत नावीन्यपूर्ण विषयांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या स्पर्धेत कायमच केला जातो. विषय निवडताना सातत्याने त्याच त्या विषयाची मांडणी कमी व्हावी, मुलांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन काही नावीन्यपूर्ण विचार करावा, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे संवेदनशील विषय टाळून नावीन्यपूर्ण विषय हाताळावेत अशी आमची खूप प्रामाणिक भावना आहे आणि होती. या अनुषंगाने आम्ही या वर्षांसाठी काही नियम स्पर्धेच्या नियमावलीत समाविष्ट केले होते. परंतु दुर्दैवाने त्याचा चुकीचा अर्थ काही ठिकाणी घेण्यात येतो आहे.

प्रकरण काय?

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, अनुच्छेद ३७०, भारत-पाकिस्तान, राम मंदिर-बाबरी मशीद याबाबतचे कुठलेही विषय, तसेच कोणत्याही जाती-धर्माबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय स्पर्धेत सादर करण्यास परवानगी दिली जाणार नाही. या प्रकारचे कुठलेही विषय घेऊन सादरीकरण केल्यास त्याचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही, असे नियमावलीत नमूद केले होते. अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना कोणते विषय सादर करू नयेत, याबाबतची सूचना दिली जात नसल्यामुळे फिरोदिया करंडकने घेतलेल्या भूमिकेवर सर्वच स्तरांतून टीका झाली.