22 October 2020

News Flash

सोहळा नाही, केवळ पादुकांची वारी!

राज्यातील प्रमुख चार संस्थानांचा निर्णय

राज्यातील प्रमुख चार संस्थानांचा निर्णय

पुणे : पालखी सोहळा आणि आषाढीच्या वारीबाबत आळंदी आणि देहूसह विविध संस्थानांकडून शासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यावर ३० मे रोजी निर्णय होणार आहे. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीचा पालखी सोहळा टाळून केवळ वारीची परंपरा कायम ठेवत संतांच्या पादुका वाहनातून पंढरीला घेऊन जाण्याचा निर्णय राज्यातील प्रमुखांपैकी चार संस्थानांनी घेतला आहे. पायी वारीसाठी पाच वारकऱ्यांना परवानगीची मागणीही त्यांनी केली आहे. त्यात संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई या संस्थानांचा समावेश आहे.

करोना विषाणूचे संकटामुळे यंदा आषाढीची वारी आणि राज्यभरातील विविध पालखी सोहळ्यांबाबत सध्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. नेहमीप्रमाणे यंदा पालखी सोहळा नको, तर केवळ वारीची परंपरा टिकावी म्हणून अत्यल्प वारकऱ्यांच्या सहभागात कोणत्याही गावात मुक्काम न करता संतांच्या पादुका पंढरपुरात जाव्यात, अशी भावना संप्रदायातील बहुतांश मंडळींकडून मांडण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराममहाराज देवस्थानमध्येही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही शासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. काही ठरावीक मंडळी पालखी सोहळ्याची भूमिका मांडत आहेत. तर, काहींनी अत्यल्पवारकऱ्यांच्या संगतीने संतांच्या पादुकांच्या वारीची भूमिका मांडली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने शासनाकडे तीन पर्यायांचा प्रस्ताव दिला आहे. त्यात ४०० वारकऱ्यांच्या संगतीने नेहमीप्रमाणे पालखी सोहळा काढण्यासह ३० व्यक्तींसह माउलींच्या पादुका वाहनाने पंढरीला घेऊन जाण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सर्व संस्थानांच्या प्रमुखांशी चर्चा करून ३० मेनंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. वारी किंवा दिंडी काढताना शासनाची परवानगी आवश्यक असल्याचेही त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाचा निर्णय येण्यापूर्वी चार संस्थानांनी नेहमीचा पालखी सोहळा न काढता केवळ मानकऱ्यांमार्फत संतांच्या पादुका वाहनांतून पंढरीला घेऊन जातील, असा पर्याय दिला आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असताना त्यात शासनाला अडचणीत आणायचे नाही. संकटाचा काळ लक्षात घेता यंदा नेहमीप्रमाणे पालखी सोहळा होणार नाही. मात्र, वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका मानकरी मंडळी वाहनातून पंढरीला घेऊन जातील. त्याचप्रमाणे पाच वारकरी शासनाचे सर्व नियम पाळून वारी पूर्ण करतील, असा आमचा प्रस्ताव आहे. त्यास शासनाने मान्यता द्यावी.

– रघुनाथबुवा गोसावी, संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख, पैठण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:10 am

Web Title: organizations various demands regarding palkhi ceremony and ashadi wari zws 70
Next Stories
1 आधी लढाई करोनाशी..
2 लघुउद्योग, व्यावसायिकांना तीन महिने मिळकतकरात माफी
3 पुण्यातून विशेष रेल्वेला बिहारसाठी सर्वाधिक मागणी
Just Now!
X