गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असताना महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रामीण भागातील शिबिरे घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची, २० मार्चपूर्वी गावांमध्ये शिबिर घेण्याची सूचना विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व शिकवले जाते. तसेच त्यात सहभागी विद्यार्थ्यांंना त्याचे गुण मिळतात. प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि वर्षांतून एक शिबिर घेतले जाते. त्यात स्वच्छता, पाणलोट क्षेत्राचे काम, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण अशा विविध विषयांसंदर्भात काम केले जाते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतर्फे दरवर्षी शिबिर आयोजित करण्यात येते. २०२० मध्ये महाविद्यालयांनी संयुक्तपणे १५० शिबिरे घेतले होती. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे शिबिरांसंदर्भात महाविद्यालयांकडून विद्यापीठाला विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालयांकडून शिबिरासाठीचे अर्ज मागवले आहेत.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी उपस्थितीबाबत प्रतिबंध आहेत. परंतु राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्रशासित असल्याने आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप विशेष शिबिरांबाबत कोणतीही सवलत अथवा नियमावलीमध्ये मुभा जाहीर नसल्याने अध्यादेश १६३ नुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना गुण प्रदान करणे अथवा राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराचे नामनिर्देशन करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन अनिवार्य आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, विद्यापीठ आणि राज्य, केंद्र सरकारच्या नियमावलींना अनुसरून शिबिराचे आयोजन करण्याची तयारी करावी. विशेष शिबिरे स्थगितीबाबतचे निर्देश प्राप्त झाल्यास कळवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संसर्गाचा धोका..

शिबिरात शंभरपेक्षा कमी विद्यार्थी सहभागी असले, तरी संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे या शिबिराद्वारे ग्रामीण भागात संसर्गाचा शिरकाव होऊ शकतो, असे काही प्राध्यापकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय संसर्गाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शिबिरासाठी पालकांकडून परवानगी मिळण्याबाबतही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.