माझेही पूर्वज हे हिंदूच होते. ते अरबस्थान किंवा इतर प्रांतातील नव्हते. मग नागरिकत्व कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी किंवा कागदपत्रं का मागितली जात आहेत? असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनी सरकारला केला आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सय्यदभाई यांचा ‘स्त्री आधार केंद्र’ आणि ‘परिवर्तन’ संस्थेच्यावतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्यात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मिलिंद जोशी, शैलेश गुजर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी सय्यदभाई यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनींसोबत संवाद साधला.

सय्यदभाई म्हणाले, “देशात सध्या अनेक ठिकाणी महिला नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरज असून सरकारकडून एखाद्या तरी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. नागरिकत्व कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी का केली जात आहे किंवा कागदपत्रं का मागितली जात आहेत. माझे पूर्वज हे हिंदू होते, ते अरबस्थानमधील किंवा इतर प्रांतातील नव्हते. ते दलित आणि तळागाळातील होते. त्यांच्यावर अत्याचार झाल्याने पुढे चालून त्यांनी धर्मांतर केलं.”

आपण धर्म आणि जात या गोष्टी राजकारणात आणूच नयेत. देशामध्ये आणि नागरिकांच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी निवडणुका होतात. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे निवडणुकीत आणता कामा नयेत. दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपली कामं जनतेसमोर मांडली. तर विरोधकांना त्यांची काम दाखवता आली नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून विरोधकांना उत्तर मिळाले आहे, अशा शब्दांत सय्यदभाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, “मी कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता, केंद्र सरकारने मला पद्मश्री पुरस्कार दिला, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेकांचे फोन आले. त्यामुळे अजून कामं करण्याची ताकद मिळाली आहे. आजपर्यंत महिलांच्या प्रश्नावर लढा देण्याचे काम मी केले असून या पुढील काळात देखील हा लढा असाच सुरू राहणार आहे. आपल्या समाजातील महिलांना धर्माच्यापलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहिले गेले पाहिजे, त्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे.