आमच्या पक्षाची सुरुवात दोन खासदारांपासून झाली आणि आज आम्ही सत्तेमध्ये जाऊन बसलो आहोत. या संपूर्ण काळात आम्ही प्रचंड संघर्ष केला असून आमचा डीएनए विरोधी पक्षात बसण्याचा आहे. तसेच, आम्ही सत्तेसाठी विचारधारा सोडलेली नाही. त्यामुळे अजून ही घोडा मैदान दूर नाही. काही लोक भाजपाची अवस्था पाण्याच्या बाहेरील फडफडणार्‍या माशा सारखी झाली आहे, असे म्हणत आहेत. आता त्यांना सत्ता आली असल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर टवटवी आली असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लगावला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेनेने आपली विचारधारा सोडून भूमिका घेतल्याने मूळ शिवसैनिक नाराज आहेत. त्याच दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, बंगले, ऑफिस यावरून महाविकासआघाडीच्या मंत्र्यामध्ये नाराजी पाहण्यास मिळाली आहे. मात्र, या सर्व घडामोडी आता घडून गेल्या आहेत. त्यामुळे या मंत्र्यानी खुर्चीच्या खेळात न रमता जनतेचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला देखील महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना दरेकर यांनी यावेळी दिला. तसेच, ज्या मंत्र्यावर आरोप आहेत. त्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असल्याचे देखील ते म्हणाले.

जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने आपली विचारधारा सोडली आहे. अशा वेळेस ती जागा भरून काढण्याची संधी मनसेला आहे. असे म्हणत भाजपा सोबत युती करण्याचा अप्रत्यक्षपणे प्रस्ताव मनसेला प्रविण दरेकर यांनी यावेळी दिल्याचे दिसून आले .

नवीन मित्र आले तर तपासून घ्यावे लागेल –
इतक्या वर्षांचा जुना मित्र सत्तेसाठी अशा पद्धतीने दुर गेला आहे. त्यामुळे भविष्यात नवीन मित्र आमच्याकडे आले, तर तपासून घ्यावे लागेल. असेही दरेकर यांनी यावेळी बोलून दाखवले.