राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. या महाशिवआघाडीचा लवकरच समान कार्यक्रम तयार होईल. त्यानंतर आघाडीतील इतर छोट्या पक्षासोबत चर्चा होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या तीन पक्षांप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं लक्ष्य असल्याची भुमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.

राजू शेट्टींनी आज राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सांगली आणि कोल्हापूर या भागात महापुरामुळे लाखो शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्या भागातील शेतकरी संकटातून बाहेर पडत नाही, तोवर मागील महिन्याभरात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाताला आलेले पीक गेले आहे. यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापना करण्याचा दावा करता आला नाही. यामुळे राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ज्या शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून १८ हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्यपालांकडून जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असून यातून शेतकर्‍यांच्या पिकासाठी आलेला खर्च निघणार नाही. उलट या पैशातून शेतकरी आत्महत्या करण्यासाठी दोर खरेदी करेल, अशा कटू शब्दांत राजू शेट्टी यांनी राज्यपालांच्या मदतीवर टीका केली.

येणाऱ्या सरकारने शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करावा आणि शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणीही यावेळी शेट्टी यांनी केली.