प्रशांती कॅन्सर केअर सेंटर या संस्थेतर्फे रविवारी (२१ डिसेंबर) स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून स्त्रियांबरोबर पुरूषदेखील मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा अंतरांच्या या मॅरेथॉनमध्ये स्तनांच्या कर्करोगातून बऱ्या झालेल्या व्यक्तीही सहभाग घेणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण, सुनील शेट्टी, नवाझुद्दिन सिद्दकी, अभिनेत्री काजोल, तनिषा आणि स्वप्नील कुलकर्णी आदि या वेळी हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. स्तनांचा कर्करोग बरा होऊ शकतो, कर्करुग्ण महिलेला स्तन गमवावा लागू नये यासाठीही विविध प्रतिबंधक उपाय आहेत, याविषयी या वेळी जनजागृती केली जाणार आहे.
‘प्रशांती’ संस्थेसह ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ, रन बुद्धिस्ट क्लब या संस्था व फिनोलेक्स पाईप्स यांनी मॅरेथॉनच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. तसेच पोलिस खात्याचीही मदत घेण्यात आली आहे. अधिक माहिती  http://ourmarathon.orgया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.