राज्यभर आंदोलनानंतर सरकारचा बचावात्मक पवित्रा; ‘एमपीएससी’ परीक्षेच्या तारखेची आज घोषणा

राज्यसेवा परीक्षेच्या के वळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर परीक्षार्थींच्या भावनांचा गुरुवारी उद्रेक झाला. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आणि विरोधकांनीही आंदोलनात उडी घेतली. या तीव्र पडसादामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. आठवड्याभरात परीक्षा घेणार असून, शुक्रवारी नवी तारीख जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा १४ मार्चला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आयोगाने परीक्षेची प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दुपारी जाहीर के ले.

करोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, गुरुवारच्या निर्णयानंतर संतापलेल्या परीक्षार्थींचा उद्रेक झाला. पुण्यात परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने एकत्र येत दुपारी शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू के ले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते आणि विविध संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. राज्य शासनाने परीक्षा घेण्याचे नवे परिपत्रक जाहीर के ल्याशिवाय रस्ता न सोडण्याची भूमिका उमेदवारांनी घेतली. त्यामुळे पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह शास्त्री रस्त्यावर दाखल झाले, दंगलविरोधी पथकालाही पाचारण करावे लागले.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच्या काळात अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई, वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा यासह विविध परीक्षा झाल्या. या परीक्षांच्या वेळी, राजकीय नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनावेळी, ग्रामपंचायत निवडणुकांवेळी करोनाची बाधा झाली नाही, पण राज्यसेवा परीक्षेलाच अडथळा करून राज्य शासन परीक्षार्थींच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळत आहे, असा आरोप परीक्षार्थींनी केला. तीन-चार वर्षांपासून आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन पुण्यात राहात आहोत. २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर राज्यसेवेची परीक्षा झाली नाही. आधीच आमची दोन वर्षे वाया गेली आहेत, अशी व्यथाही परीक्षार्थींनी मांडली.

एमपीएससीची परीक्षा ठरल्याप्रमाणे झालीच पाहिजे, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची वाट पाहात होते. मात्र करोनाचे कारण देऊन परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली. करोना प्रतिबंधात्मक काळजी घेऊन परीक्षा घ्यायला हरकत नव्हती, पण सरकारने विद्याथ्र्यांचे वाटोळेच करायचे ठरवले आहे, तर पर्याय कसा सुचेल, अशा शब्दांत सातपुते यांनी टीका के ली.

सांगलीत रास्ता रोको

सांगली : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी विद्याथ्र्यांनी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात विद्याथ्र्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

नगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

नगर : पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकल्याचे वृत्त पसरताच नगरमध्येही विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत सरकारविरोधी घोषणा दिल्या. शहरातील नीलक्रांती चौक, दिल्ली गेट भागात रास्ता रोको आंदोलन केले.

औरंगाबादमध्येही आंदोलन

औरंगाबाद : परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयानंतर औरंगाबाद शहरातील महात्मा फुले चौकात ४०० ते ५०० विद्याथ्र्यांनी आंदोलन केले. औरंगाबाद येथील केंद्रावर १९ हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

नाशिकमध्ये निर्णयाची प्रत फाडून निषेध

नाशिक : परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाची प्रत फाडून नाशिकमध्ये परीक्षार्थींनी सरकारचा निषेध केला. शहरातील ज्ञानेश्वरी अभ्यासिके बाहेर शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र आले. त्यापैकी काहींनी परिपत्रक फाडत सरकारच्या निर्णयाचा निषेध के ला.

जबाबदार कोण?

  • राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या लेखी पत्राचा हवाला देऊन घेतल्याचे एमपीएससीने जाहीर के ले.
  • आपल्या विभागाने मला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
  • दुसरीकडे, या सर्व प्रकाराला एमपीएससीचे अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
  • राज्य सरकारशी संपर्क ठेवून नियोजन करून परीक्षा घेण्याची जबाबदारी एमपीएससी प्रमुखांनी योग्य रीतीने पार पाडली नाही, असा ठपका त्यांनी ठेवला.

‘परीक्षा आठवड्याभरात’

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रविवार १४ मार्चला होणारी परीक्षा ऐन वेळी स्थगित झाल्यामुळे संतापलेल्या विद्याथ्र्यांनी राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याची दखल घेत एमपीएससी परीक्षा पुढच्या आठवडाभरात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शुक्रवारी तारीख जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाला दिले. तसेच वयाच्या अटीची अडचणही कोणाला येणार नाही, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. विद्याथ्र्यांनी-पालकांनी कोणालाही राजकीय कारणांसाठी आपला वापर करू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी के ले.

नेहमी सर्वसाधारणपणे रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधतो. याद्वारे माझे कर्तव्य पार पाडतो. राज्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी परीक्षांची तारीख जाहीर झाली. नंतर ती पुढे ढकलली. त्याच वेळी मी सांगितले होते की, ती पुन्हा पुढे ढकलली जाणार नाही. विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करत आहेत. करोनाच्या परिस्थितीमुळे रविवार, १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली. काही ठिकाणी सरकारी यंत्रणा करोना नियंत्रणाच्या कामात असल्याने एमपीएससी परीक्षा घेण्याची विविध कामे करण्यासाठी मनुष्यबळाचा प्रश्न होता. तसेच ज्या कर्मचाºयांचा मुलांशी संपर्क  येईल त्यांना करोना लस प्राधान्याने द्यावी, असे निर्देश दिले आहेत. आपल्याला प्रश्नपत्रिका वाटणाऱ्या कर्मचाऱ्यालाच करोना तर झाला नसेल ना असा संशय येऊन उमेदवारांवर दडपण येऊ नये. मुलांना निश्चिंतपणे परीक्षा देता यायला हवी. यासाठी १४ मार्चऐवजी पुढच्या ८ दिवसांत ही परीक्षा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.