दोघे गजाआड; पाच दुचाकी जप्त

झटपट पैसे कमविण्यासाठी मालधक्का परिसरात हमाली करणाऱ्या एकाने साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने दोघांना गजाआड केले असून त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रणजितकुमार जयरामप्रसाद गौड (वय २६, मूळ रा. नेनापार, जि. देवरिया, उत्तरप्रदेश,सध्या रा. मालधक्का परिसर, पुणे रेल्वे स्थानक) आणि बबलू पताली सरोज (वय २१, मूळ रा. मनसुराबा, जि. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. गौड याला उत्तरप्रदेश पोलिसांनी मोबाईलचोरीच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. या गुन्ह्य़ात त्याला शिक्षादेखील झाली होती. तेथील कारागृहातून सुटल्यानंतर तो पुण्यात मजुरी करण्यासाठी आला होता. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या मालधक्का येथे त्याने हमाली करण्यास सुरुवात केली. मात्र, काम करण्यापेक्षा दुचाकी चोरीचा उद्योग केल्यास झटपट पैसे मिळतील, असे गौड याने त्याचा मित्र सरोज याला सांगितले. त्यानंतर या दोघांनी शहरातून दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. हडपसर येथील वैभव चित्रपटगृहानजीक हे दोघे जण दुचाकी चोरण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून गौड आणि त्याचा साथीदार सरोज याला पकडण्यात आले. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. खडकी, चतु:श्रुंगी, हडपसर येथून त्यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. सहायक फौजदार स्टिव्हन सुंदरम, हवालदार शिवानंद स्वामी, शिवाजी राहिगुडे, जावेद पठाण, सुजित पवार यांनी ही कारवाई केली.