ओला, उबरसाठी शहरात मोठय़ा प्रमाणावर वाहने; वाहतुकीच्या गंभीर स्थितीतही प्रशासनाचे दुर्लक्ष

पुण्यात नोंदवलेल्या वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षाही अधिक होऊन वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच बाहेर नोंदवल्या प्रवासी वाहनांचीही पुण्यात मोठय़ा प्रमाणावर भर पडत आहे. प्रामुख्याने ओला, उबरसारख्या अ‍ॅपवर चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायासाठी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर होत असून, त्याचा भार शहरातील वाहतुकीवर पडत आहे. प्रशासनाकडून मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात मार्चअखेर एकूण वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार इतकी झाली आहे. दरवर्षी त्यात अडीच ते तीन लाखांनी भर पडते आहे. कमकुवत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे शहरांतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर खासगी वाहनांची खरेदी केली जात आहे. दुचाकींबरोबरोबरच मोटारींची संख्याही त्यात सर्वाधिक आहे. लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक झाल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी बहुतांश रस्त्यांवर वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. असे वास्तव असताना प्रवासी वाहतुकीसाठी शहरात बाहेरील वाहने मोठय़ा प्रमाणावर दाखल होत असल्याने वाहतुकीची स्थिती आणखी गंभीर होत आहे.

सद्य:स्थितीमध्ये शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ५३ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. रिक्षाचे परवाने खुले केल्यामुळे ही संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे कॅब सेवेमध्ये असणाऱ्या २८ हजारांहून अधिक वाहने पुण्यात आहेत. त्यातच आता प्रवासी वाहतुकीसाठी राज्याच्या विविध भागात नोंदणी झालेली वाहने मोठय़ा प्रमाणावर पुण्यात दाखल होत आहेत. ओला, उबर कंपन्यांकडून अशा वाहनांना त्यांच्या व्यावसायात सामावून घेतले जात आहे. पुण्यात नोंदलेल्या कॅबची संख्या २८ हजार असली, तरी बाहेरून पुण्यात येऊन व्यावसाय करणारी वाहनेही मोठय़ा प्रमाणावर असल्याने पुण्यातील कॅबची संख्या ३५ हजारांच्या आसपास असल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. बाहेरच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. बाहेरील वाहनांना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याचेही वास्तव आहे.

बाहेरील वाहनांवर मर्यादा आवश्यकच

पुणे शहरात नोंदणी होत असलेल्या वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना बाहेरील वाहनेही प्रवासी वाहतुकीसाठी शहरात येत असल्याने वाहतुकीचा प्रश्न उग्र रूप घेत आहे. अशा स्थितीत बाहेरील वाहनांवर मर्यादा आणणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. बाहेर नोंदणी झालेले खासगी वाहन कायमस्वरूपी शहरात चालवायचे असल्यासही त्यास कागदोपत्री परवानगी घ्यावी लागते. मात्र, प्रवासी वाहतुकीसाठी शहरात बाहेरची वाहने आणली जात असताना त्यावर कोणतेही बंधन नाही. रिक्षाप्रमाणे या वाहनांनाही व्यवसाय क्षेत्राबाबत मर्यादा घालाव्यात, अशी मागणी होत आहे.

शहराबाहेर नोंदणी झालेल्या आणि शहरात व्यवसाय करणाऱ्या प्रवासी वाहनांचा मोठा भार शहरावर पडत आहे. त्यातून वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. बाहेरून येणाऱ्या या वाहनांवर नियंत्रण आणणे प्रशासनाच्या हातात आहे. मात्र, त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात आहे.

नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते