देशाला जर आर्थिक महासत्ता व्हायचे असेल तर विज्ञानातील प्रगतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ व भारतरत्न जाहीर झालेले ख्यातनाम वैज्ञानिक सीएनआर राव यांनी २०११ मध्ये त्यांना पुण्यात सोळावा एच के फिरोदिया जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या वेळी व्यक्त केले होते. त्यांच्या प्रत्येक भाषणातून जाणवतो तो त्यांचा स्पष्टवक्तेपणा. अलीकडेच त्यांनी आपण विज्ञान क्षेत्रात अमेरिका व चीनच्या तुलनेत मागे आहोत असे मत व्यक्त केले आहे, तर नॅनोतंत्रज्ञानातील प्रगतीत भारत-चीन-अमेरिका यांच्यात चढाओढ असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या मते भारतातील आयआयटी व आयआयएस्सी या संस्था जागतिक दर्जाच्या नाहीत. आपण वैज्ञानिक होण्याचे ठरवले तेव्हा दारिद्य््रा हा एक शाप होता आता विज्ञान संशोधन क्षेत्रात आर्थिक स्थिती सुधारली आहे, तुलनेने सुविधा वाढल्या आहेत, असे ते सांगतात. मंगळ मोहिमेविषयीही मत व्यक्त करताना त्यांनी मंगळयान मोहीम योग्यच असल्याचे मत व्यक्त केले होते, जे विज्ञाननिष्ठेला धरूनच होते.  पुण्यातील त्यावेळच्या भाषणातही त्यांनी भारताला आशियात जपान, दक्षिण कोरिया व चीन या देशांकडून खरी स्पर्धा असल्याबाबत सावधतेचा इशारा दिला होता. विज्ञान क्षेत्रात भारताला स्पर्धेस तोंड द्यावेच लागेल. आपल्या समाजात आता पैशाला महत्त्व आले आहे. शिष्यवृत्ती, विद्यावृत्ती यापेक्षा कोण किती पैसे मिळवतो याला महत्त्व आले ही मूल्यव्यवस्था बदलली पाहिजे. चीनमधील तरुण पिढी मात्र वेगळी आहे. तेथे संशोधनाला महत्त्व आहे. आपल्या समाजात विज्ञान व गणिताला महत्त्व दिले जात नाही ते मिळाले पाहिजे. भारतातील ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात तेथील बुद्धिमान मुला-मुलींना निवडून संशोधन क्षेत्रात पुढे आणले पाहिजे, असेही त्यांनी पुण्यातील भाषणात सांगितले होते.
 राव यांची मते
* ‘मी जेव्हा विज्ञान क्षेत्रात कारकीर्द सुरू केली तेव्हा मला वर्णपंक्तीशास्त्रात संशोधन करायचे होते पण त्यावेळी आपल्याकडे वर्णपंक्तीमापी म्हणजे स्पेक्ट्रोस्कोप नव्हते. आम्ही भारतातील विज्ञान संशोधन परिषदांना रेल्वेने तिसऱ्या वर्गाने प्रवास करीत जात असून विमान प्रवास शक्य नव्हता, परदेशात जाणे ही कल्पना होती.’
* ‘दुर्दैवाने रसायनशास्त्राला अपेक्षित मान्यता मिळाली नाही पण ते मूलभूत शास्त्र आहे. रसायनशास्त्राशिवाय समाजाची प्रगती होऊ शकणार नाही’
* ‘जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, प्रगत पदार्थ विज्ञान यांच्याशी रसायनशास्त्राची सांगड घालणारे आंतरविद्याशाखीय विज्ञान शिक्षण ही काळाची गरज आहे’
 संगणकाचा तिटकारा
रसायनशास्त्रज्ञ असलेल्या सीएनआर राव यांना संगणकाचा तिटकारा आहे. त्यांनी त्यांच्या टेबलावरील सर्व संगणक काढून टाकले आहेत. कारण त्यामुळे लक्ष विचलित होते असे ते म्हणातात. ते आता कुठल्याही इमेलला स्वत: उत्तरे देत नाहीत. त्यांच्या मते ते वेळ वाया घालवण्यासारखे आहे. त्यांचे सहकारी कर्मचारी इमेल बघतात व काही महत्त्वाचा असेल तर त्यांच्या निदर्शनास आणतात. नंतर मात्र ते त्या इमेलला लगेच उत्तर पाठवतात. ते मोबाईल फोनही वापरत नाहीत. फक्त पत्नी इंदू हिच्याशी बोलताना आपण मोबाईल वापरतो असे ते सांगतात.
त्यांनी बालपणीच्या आठवणी सांगताना म्हटले आहे की, एकदा नोबेल विजेते भारतीय वैज्ञानिक सी.व्ही.रमण आमच्या शाळेत आले होते. त्यांची प्रयोगशाळा पाहण्याचे भाग्यही आम्हाला लाभले होते. त्यांच्यामुळे तर विज्ञानाची प्रेरणा मिळालीच पण पुढे बनारस हिंदू विद्यापीठात आपण कोऱ्या कागदावर अर्ज केलेला असताना एस एस जोशी यांनी आपल्याला तार करून बोलावून घेतले व एमएस्सीला प्रवेश दिला, त्यांच्यामुळे आपण विज्ञान क्षेत्राकडे वळलो असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते
तरुणांना प्रेरणा
 विज्ञानातील माझ्या संशोधनाला व परिश्रमांना मान्यता दिल्याबद्दल मी देशाचा ऋणी आहे, यामुळे तरूण लोकांना विज्ञानाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया डॉ. सीएनआर राव यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली आहे.                 सीएनआर राव यांची कारकीर्द
जन्म ३० जून, १९३४, बंगलोर, कर्नाटक
नागरिकत्व-भारतीय
संशोधनाचे क्षेत्र-रसायनशास्त्र
काम केलेल्या संस्था- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च
माजी विद्यार्थी- बनारस हिंदू विद्यापीठ, परडय़ू विद्यापीठ
शिक्षण- बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी., म्हैसूर विद्यापीठातून डॉक्टरेट नंतर परडय़ूसह ४६ विद्यापीठांची डॉक्टरेट
संशोधनाचा विशिष्ट विषय- सॉलिड स्टेट केमिस्ट्री, मटेरियल सायन्स.
पुरस्कार-
मालरे फॅरेडे पदक (१९६७)
भटनागर पुरस्कार (१९६८)
जवाहरलाल नेहरू फेलोशिप (१९७३)
पद्मश्री  (१९७४)
अमेरिकन केमिस्ट्री सोसायटीची फेलोशिप (१९७६)
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडनचे पदक (१९८१)
एफआरएस( फेलो ऑफ रॉयल सोसायटी) (१९८४)
पद्मविभूषण (१९८५)
ह्य़ुजेस पजक (२०००)
 इंडिया सायन्स अ‍ॅवॉर्ड (२००४)
डॅन डेव्हिड पुरस्कार (२००५)
लिजन ऑफ ऑनर (२००५)
अब्दुस सलाम पदक  (२००८)
भारतरत्न (जाहीर १६ नोव्हेंबर २०१३, प्रदान जानेवारी २०१४)
भूषवलेली पदे
सध्या पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे प्रमुख
द अ‍ॅकडमी ऑफ द सायन्सेस फॉर द डेव्हलपिंग वर्ल्डचे अध्यक्ष
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सदस्य
इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष
द इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसचे संचालक
द इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री
राजीव गांधी यांच्या काळात विज्ञान सल्लागार परिषदेचे अध्यक्ष
अल्बर्ट आइनस्टाइन रीसर्च प्रोफेसर

कारकीर्दीतील प्रेरणादायी क्षण
एप्रिल १९६३ मधील रणरणत्या उन्हाळ्यातील एका दुपारी ते कानपूरला आले व तेथे आयआयटीत काम सुरू केले. १९७६ पर्यंत ते तिथे काम करीत होते. आयआयटी कानपूरचे संचालक पी. के. केळकर यांचा राव यांच्यावर मोठा विश्वास होता. त्यांनी वयाच्या २९ वर्षी त्यांना रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद दिले. १९६४ मध्ये ख्यातनाम नोबेल विजेते वैज्ञानिक  सी.व्ही. रमण यांनी सीएनआर राव यांना एक पत्र पाठवले त्यात त्यांनी राव यांची इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड केल्याचे म्हटले होते, त्यामुळे आपण विज्ञान विषयात आणखी जोमाने कामगिरी करू शकलो असे ते सांगतात. १९६७ मध्ये मिळालेले मालरे पदक हा अभिमानास्पद क्षण होता. नंतर त्यांनी बंगलोरला येऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत सॉलिड स्टेट अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्री हा स्वतंत्र विभाग सुरू केला. १९७४ मध्ये ते या संस्थेचे संचालक झाले. जक्कूर येथे त्यांनी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च ही संस्था स्थापन केली.

संशोधन- सीएनआर राव यांनी सॉलिड स्टेट अँड मटेरियल या रसायनशास्त्राच्या शाखेत संशोधन केले असून गेली पन्नास वर्षे अनेक विषयांवर संशोधन केले. त्यात त्यांनी धातूंच्या ऑक्साइडचे रूपांतरण नेमके कसे होते यावर प्रकाश टाकला. एलए २ सीयूओ४ या ऑक्साइडचे विश्लेषण त्यांनी केले. नियंत्रित स्थितीमधील रोधक धातू या विषयावर त्यांनी संशोधन केले असून अतिवाहकतेच्या क्षेत्रातही त्यामुळे बरीच प्रगती झाली आहे. भारताला नॅनो तंत्रज्ञानात चीन, अमेरिका यांच्या तोडीस तोड कामगिरी भारताने केली त्याचे श्रेय राव यांना आहे. त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली असून त्यांचे १५०० शोधनिबंध आहेत. संशोधनात त्यांनी एच इंडेक्स १०० ही सर्वोच्च पातळी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्षांच्या निमित्ताने त्यांनी केमिस्ट्री टुडे हे पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी धातुशास्त्र, इलेक्ट्रॉनचा शोध, आधुनिक रसायनशास्त्र यांचा आढावा घेतला आहे. उच्च तापमानाला अतिवाहकता, नॅनोरसायनशास्त्र व इतर अनेक आव्हानांची चर्चा त्यांनी या पुस्तकात केली आहे.
भारत रत्न मिळालेले वैज्ञानिक सी.व्ही. रमण (१९५४), एम. विश्वेश्वरय्या (१९५५), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७), सी एन आर राव ( जाहीर २०१३ – प्रदान २०१४)