केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांनी दमदार कामगिरी केली असून, राज्यातील ६० हून अधिक उमेदवारांची निवड  झाली आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे मुलाखतींचा टप्पा लांबला होता. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास यंदा विलंब झाला. राष्ट्रीय पातळीवरील निकालात प्रदीप सिंहने पहिला क्रमांक मिळवला, तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केले.

आयोगाकडून प्रशासकीय सेवा (आयएएस), परराष्ट्र सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील लेखी परीक्षा सप्टेंबर २०१९ आणि मुलाखती फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यान झाल्या. देशभरातील उमेदवारांतून ८२९ उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यात आयएएससाठी १८०, आयएफएससाठी २४, आयपीएससासाठी १५०, गट ‘अ’ साठी ४३८ आणि गट ‘ब’ साठी १३५ उमेदवारांचा समावेश असल्याचे आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालपत्रात नमूद केले आहे.

सामान्य कुटुंबातील तरुणांची गरुडझेप

बीड  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून या वेळीही जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तब्बल सहा जणांनी यश मिळवत प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. चंपावती विद्यालयात प्राथमिक शिक्षण झालेल्या जयंत मंकले याने अंधत्वावर मात करत यश मिळवून नवाच अध्याय उभा केला. तर मंदार पत्की या अवघ्या २३ वर्षीय तरुणाने पहिल्याच प्रयत्नात देशातून बाविसावा येत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. डॉ.प्रसन्ना लोध, वैभव वाघमारे, नेहा किर्दक यांनीही भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला.

निवडीचे प्रमाण..

निवड झालेल्या उमेदवारांमध्ये पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार ते पाच उमेदवारांना स्थान मिळाले आहे. तर, एकूण निकालातील राज्यातील उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण आठ ते नऊ टक्के आहे. काही उमेदवारांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले असून, गेल्यावर्षी निवड झालेल्या काही उमेदवारांनी पुन्हा यश मिळवून क्रमवारीतील स्थान उंचावले आहे.

राज्यातील यशवंत..

नेहा भोसले (१५), मंदार पत्की (२२), आशुतोष कुलकर्णी (४४), योगेश पाटील (६३), विशाल नरवडे (९१), राहुल चव्हाण (१०९), जयंत मंकले (१४४), कुलदीप जंगम (१३५), नेहा देसाई (१३७), अभयसिंह देशमुख (१५१), सागर मिसाळ (२०४), माधव गित्ते (२१०), कुणाल चव्हाण (२११), सचिन हिरेमठ (२१३), सुमीत महाजन (२१३), श्रेणिक लोढा (२२१), अविनाश शिंदे (२२६), शंकर गिरी (२३०), श्रीकांत खांडेकर (२३१), योगेश कापसे (२४९), गौरी पुजारी (२७५), प्रसाद शिंदे (२८७) मंदार देशपांडे (३३४), आदित्य काकडे (३८२), नेहा किर्दक (३८३), निमिष पाटील (३८४), महेश गिते (३४९), अविनाश जाधवर (३९९), प्रेमानंद दराडे (४३९), हृषीकेश देसाई (४८१), नकुल देशमुख (४८९), सुब्रमण्य केळकर (४९७)