News Flash

आरोग्यावरील नवीन पुस्तकांनी गाठली ‘शंभरी’!

या वर्षी बाजारात आलेल्या ‘आरोग्य’ या एकाच विषयाशी निगडित असलेल्या पुस्तकांची संख्या शंभरच्या पुढे गेली अाहे.

| November 15, 2014 03:20 am

जानेवारीपासून नव्याने बाजारात आलेल्या आरोग्यावरील पुस्तकांनी शंभरी गाठली आहे! या वर्षी बाजारात आलेल्या ‘आरोग्य’ या एकाच विषयाशी निगडित असलेल्या पुस्तकांची संख्या शंभरच्या पुढे गेली असून गेल्या दोन ते तीन वर्षांत बाजारातील आरोग्यावरील नवीन पुस्तकांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली दिसून येत आहे. पुस्तक विक्रीतील व्यावसायिकांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.
‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर म्हणाले, ‘‘गेल्या दोन ते तीन वर्षांत आरोग्यावरील जितकी नवीन पुस्तके आली त्याचे प्रमाण या वर्षी दुप्पट झाले आहे. या वर्षी बाजारात आलेल्या आरोग्यावरील पुस्तकांची संख्या शंभरहून अधिक असून हे वर्ष त्या दृष्टीने विशेष उत्साहवर्धक आहे. विशेष म्हणजे आरोग्यावर लिहिणारे पन्नासहून अधिक लेखक पुण्यातले आहेत. आता केवळ डॉक्टरच नाही तर फिटनेस क्लबचे चालकही स्वत:ची पुस्तके बाजारात आणू लागले आहेत.’’
आरोग्यावरील माहिती वाचकांना अधिकाधिक सोपी करून सांगण्याचा प्रयत्न बघायला मिळत असल्याचेही राठिवडेकर म्हणाले. ‘एखादे औषध पुस्तकात सांगितले आहे पण ते मिळेल कुठे याबद्दल वाचकाला संभ्रम आहे, अशी परिस्थिती आता दिसत नाही. वजन कमी करण्याविषयीच्या किंवा आहाराविषयीच्या पुस्तकांमध्ये केवळ माहिती न देता ती चार्टच्या स्वरूपात, संक्षिप्त स्वरूपात  सोपी करून दिली जाते. त्यामुळेही या पुस्तकांना वाचक वाढतो आहे. रोहन प्रकाशन, मनोविकास प्रकाशन, साकेत प्रकाशन आदि प्रकाशन संस्था यंदा आरोग्यावरील पुस्तके बाजारात आणण्यात आघाडीवर आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
 ‘मनोविकास प्रकाशना’चे आशिष पाटकर म्हणाले, ‘‘उपयुक्त साहित्य लोकप्रिय होण्याचा ‘ट्रेंड’ दिसू लागला आहे. आम्ही या वर्षी आरोग्यावरील ५ ते ६ नवीन पुस्तके बाजारात आणली आहेत. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेट लॉस’, डॉ. अरूण गद्रे यांचे ‘गुड न्यूज आहे’, डॉ. किशोर अतनूरकर यांचे ‘तिच्या आरोग्यासाठी सर्वकाही’, डॉ. मिलिंद पोतदार यांचे ‘मनाच्या अंतरंगात’, या पुस्तकांना मागणी आहेच, पण डॉ. अरूण गद्रे यांनी संकलित व शब्दांकित केलेल्या ‘कैफियत’ या आरोग्य व्यवस्थेमधील प्रश्न मांडणाऱ्या पुस्तकालाही उत्तम मागणी दिसते. अतुल कहाते यांनी लिहिलेल्या आणि सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे मुलांवर कोणते मानसिक परिणाम होतात याची चर्चा करणाऱ्या ‘तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड’ या पुस्तकाचा खपही चांगला असून आम्ही त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित करत आहोत.’’
आरोग्यावरील पुस्तके खरेदी करताना ग्राहक पुस्तकाच्या किमतीचा विचार करत नसल्याचे ‘साकेत प्रकाशन’चे साकेत भांड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘२०१३ मध्ये आम्ही आरोग्यावरील ५ ते ६ आणि या वर्षी ७ ते ८ नवीन पुस्तके बाजारात आणली आहेत. डॉ. डी. एस. कुलकर्णी यांचे ‘डायबेटिस व हृदय रक्तवाहिन्यांचे विकार’, डॉ. रमा मराठे यांचे ‘औषधाविना आरोग्य’, डॉ. संजय जानवळे यांचे ‘आई मला असं वाढव’ ही सर्व पुस्तके अधिक किमतीची असूनही त्यांना मागणी चांगली आहे.’’  

आरोग्यावरील सध्याची  लोकप्रिय पुस्तके

– ‘व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री’- ऋजुता दिवेकर
– ‘चाला आणि फिट रहा’- लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस, अनु. डॉ. अरूण मांडे
– ‘आहाराविषयी सारे काही’- वसुमती धुरू
– ‘द लिव्ह वेल डाएट’- डॉ. सरिता डावरे, शेफ संजीव कपूर
– ‘मधुमेहाचे प्रगतिपुस्तक’- डॉ. चंद्रशेखर पाटील
– ‘कैफियत’- संकलन व शब्दांकन- डॉ. अरूण गद्रे
– ‘छोटे प्रभावी आरोग्य सल्ले’- डॉ. सोनिया कक्कर- अनु. डॉ. अरूण मांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 3:20 am

Web Title: over 100 books on health
Next Stories
1 ग्राहक मंचचा मोबाईल कंपनीला दणका
2 पीएमपीला गरज कार्यपध्दती सुधारण्याची आणि पूर्ण वेळ अधिकाऱ्याची – राजीव जाधव
3 पिंपरीचा ‘स्मार्ट सिटी’त सहभाग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू – गौतम चाबुकस्वार
Just Now!
X