पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या या संख्येला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराला कुत्री पकडून त्यांची नसबंदी करण्याचा ठेका दिला आहे. वर्षभरात महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तब्बल १४ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र महापालिकेने फक्त ठेकेदाराला पोसल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सदस्यांनी केला आहे. याबाबतची माहिती प्रशासन पुढील आठवड्याच्या सभेत देणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुमारे २५ हजार कुत्री असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे.एक वर्षात १४ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडली आहेत. मात्र, त्या परिसरात वर्षभरात कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.

या संदर्भात कुत्री पकडणाऱ्या संस्थेला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.आतापर्यंत महापालिकेने ठेकेदाराला ३८ लाख रुपये दिले असून अद्यापही १५ लाख रुपये देणे बाकी आहे. तर तीन महिन्यांच्या कालावधीत तीन हजार ६०० कुत्री पकडण्याचा अंदाज असून त्यासाठी २४ लाख रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहे.पशुवैद्यकीय विभागात आकडेवारीचा गोंधळ सुरु असल्याचा आरोप भाजपाच्या एका नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.