जिल्ह्य़ातील ३६.३५ लाख ग्राहकांना मोबाइलवर विजेची माहिती

पुणे : विजेची संबंधित विविध बाबींची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणकडून मोबाइल एसएमएसचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी अधिकाधिक ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदणी करून घेतले जात आहे. आजवर पुणे जिल्ह्य़ामध्ये ३६ लाख ३५ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली असून, त्याद्वारे त्यांना विजेची संबंधित विविध संदेश पाठविले जात आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्य़ातील पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील ग्राहकांपेक्षा ग्रामीण भागातील ग्राहकांनी मोबाइल नोंदणीच्या टक्केवारीमध्ये आघाडी घेतली आहे.

महावितरणकडे मोबाइलची नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाला दरमहा वीजबिलांची रक्कम आणि इतर तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटिस, मीटर वाचन पाठविण्याचे आवाहन, मीटर वाचन घेतल्याची तारीख आणि वापर केलेली एकूण युनिट संख्या तसेच पूर्वनियोजित देखभाल किंवा दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे.

पुणे शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा १६ लाख २१ हजार ५५० (९३.०६ टक्के) ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. ग्राहकांच्या तुलनेत पुण्यात ९३.०६ टक्के मोबाइल नोंदणी झाली आहे. पिंपरी-चिंचवड  शहरातील ६ लाख ८० हजार ९६० (९३.९१ टक्के) ग्राहकांनी मोबाइल नोंदणी केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ लाख ३३ हजार ३१४ ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. ही टक्केवारी दोन्ही शहरांपेक्षा काहीशी अधिक म्हणजे ९४.१८ इतकी आहे.

वीज वापरकर्त्यांचाच मोबाइल हवा

अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर दिलेल्या घरातील स्वतंत्र वीजजोडणीच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली जाते. परिणामी वीजबिल भरणाऱ्या भाडेकरू वीजवापरकर्त्यांंना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या घरातील भाडेकरू वीजवापरकर्त्यांंनी संबंधित ग्राहक क्रमांकासोबत स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी किंवा चुकीचे मोबाइल क्रमांक दुरुस्त करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मोबाइल नोंदणी कशी कराल?

पुणे जिल्ह्यात अद्यापही २ लाख ४७ हजार २८३ वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही. यामध्ये २ लाख ३७ हजार २२७ अकृषक आणि १० हजार ५६ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहक क्रमांकासोबत मोबाइलची नोंदणी एसएमएसद्वारेही करता येते. नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर एसएमएस केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४७७ सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. www.mahadiscom.in  या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारेही मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.