24 November 2020

News Flash

एक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत

करोनामुळे काम ठप्प, उत्पन्नाचे मार्ग बंद

करोनामुळे काम ठप्प, उत्पन्नाचे मार्ग बंद

पिंपरी : करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कलावंतांचे जगणे अवघड झाले आहे. गेल्या सात महिन्यांपासून काम मिळणे बंद झाले असून उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद  झाले आहेत. कलाक्षेत्रातील अनिश्चित वातावरणामुळे उद्याचे भविष्य अंधारमय दिसू लागल्याने नैराश्याचे वातावरण आहे. िपपरी-चिंचवड शहरातील विविध कलाप्रांतात काम करणारे एक हजारांवर कलावंत याच आर्थिक विवंचनेत आहेत.

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सांस्कृतिक नगरीकडे सुरू आहे. कलेच्या विविध प्रांतात काम करणारे शेकडो कलावंत शहरात आहेत. त्यापैकी बहुतांश कलावंत गेल्या सात महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत आहेत. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कलाक्षेत्रातील सगळं काही ठप्प झाले. कामे मिळेनाशी झाली. त्यामुळे पैसे येण्याचे मार्ग बंद झाले. आधीचे साठवलेले पैसे हातोहात संपले. दररोजच्या गरजा, औषधपाणी, घरभाडे, मुलांचे शिक्षण आदींसाठी पैसे उरले नाहीत. घेतलेले कर्ज फेडता येत नाही. नव्याने कर्ज मिळू शकत नाही. जवळचे म्हणवणारे आर्थिक मदत देऊ शकले नाहीत. मासिक हप्ते फेडता येत नाही. काहींना पेट्रोलसाठी पैसे नाहीत, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यातील एका युवा नृत्य कलावंताने आत्महत्या केली. अशी वेळ कोणावरही येऊ नये, त्यादृष्टीने कला क्षेत्रात प्रयत्न सुरू झाले आहेत. पावसाळ्यात कलावंताना कामे मिळत नाही. सप्टेंबरनंतर यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांद्वारे कलावंतांची गुजराण होते. गेल्या वर्षी पुरामुळे कलावंतांना काहीच करता आले नाही. यंदा करोनामुळे सगळं ठप्प झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी कलावंतांचे हाल झाले. आता अडचणीत असलेल्या कलावंतांना मदतीचा हात न मिळाल्यास त्याला सावरणे अवघड होऊन जाईल, अशी कलावंतांची भावना आहे.

हातावर पोट असणाऱ्या कलावंतांपुढे अंधकार आहे. सगळं ठप्प आहे. काहीच सुरू होईना. कलाक्षेत्र नैराश्यात आहे. लवकर मार्ग निघाला नाही तर आणखी स्थिती गंभीर होऊ शकते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व संस्था एकत्रितपणे दाद मागणार आहोत.

– विजय उलपे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड कलाकार संघ

शहरात मोठय़ा संख्येने कलावंत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. इतर वेळी त्यांची उपेक्षा होतच असते. सध्याच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला पाहिजे.

– संदीप साकोरे, अभिनेता, निवेदक

खायला मिळत नाही आणि भीकही मागता येईना, अशी सध्याची परिस्थिती आहे. पूर्वीची कामे बंद आहेत. नवीन कामे सुरू होत नाहीत. कलावंत जगला पाहिजे. निर्मात्यांना तोटा होणार नाही आणि कलावंतांचे पोट भरेल, असा तोडगा काढला पाहिजे.

– प्रभाकर पवार, अभिनेता, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:44 am

Web Title: over a thousand artists in financial straits zws 70
Next Stories
1 प्रवेशांसाठी ३० नोव्हेंबरची मुदत; प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून
2 दहावी-बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये
3 कांदा नव्वदीपार!
Just Now!
X