पावसामुळे कचरा कुजत असल्याने माशा व दरुगधी; कचऱ्यातील प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये डास वाढण्याचीही भीती

शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरापेटय़ा भरल्यावर कचरा कुजण्याआधी त्या उचलल्या जाव्यात, कचरापेटीअभावी रस्त्यावरच कचराकुंडी तयार होणे थांबायला हवे.. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला दोन वर्षे पूर्ण होत असताना नागरिकांच्या या प्राथमिक अपेक्षा पूर्ण होण्याचे कोणतेही चिन्ह शहरात दिसून येत नाही. एकीकडे सामान्य नागरिक या अभियानासाठी कर भरत असताना घराबाहेर पडल्यावर ओसंडून रस्त्यावर वाहणारी कचराकुंडी दृष्टीस पडली नाही, असा त्याचा एकही दिवस जात नाही.

‘लोकसत्ता’ने गुरूवारी ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील कचराकुंडय़ांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी कचरापेटय़ा भरून वाहात असल्याचे लक्षात आले. सध्या अधूनमधून पावसाच्या एक-दोन सरी पडून जात आहेत. त्यामुळे कचरा कुजून त्यात मोठय़ा प्रमाणावर माश्यांची वाढ झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी चिकचिक होऊन कचराकुंडीच्या आजूबाजूचा परिसरही घाण झाला आहे. साठलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकचे ग्लास, थर्माकोलची खोकी, रिकामी शहाळी, नवरात्रीनिमित्त बाजारात येणारी मातीची भांडी अशा वस्तू प्रामुख्याने फेकून दिलेल्या दिसत आहेत. या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठून डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या डासांची वाढ होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

‘कचऱ्यात फेकलेल्या प्लॅस्टिक कंटेनरसारख्या वस्तूंमध्ये पाणी साठून तीन दिवसांत डेंग्यूच्या डासांच्या अळ्या वाढू शकतात. पावसामुळे घाण पाणी साठून मलेरियाच्या डासांचीही वाढ होऊ शकते. कचराकुंडय़ांवर वाढणाऱ्या माश्यांमुळे विषमज्वर, उलटय़ा, जुलाब आणि गॅस्ट्रोसारख्या आजारांचा फैलाव होऊ शकतो,’ असे फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले?

  • दांडेकर पुलाकडून शास्त्री रस्त्याकडे येताना भर रस्त्यातच कचऱ्याचा ढीग. या कचऱ्यात रिकाम्या शहाळ्यांसारखा कचरा. कचऱ्यावर अन्न शोधायला भरपूर कावळे आणि कुत्री
  • रमणबाग शाळेशेजारीही रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग. थर्माकोलचे बॉक्स, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा प्रामुख्याने
  • नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळील भरुन वाहणारी कचराकुंडी
  • मुलांच्या नूमवि शाळेसमोरील गल्लीतील कचराकुंडय़ा खचाखच भरलेल्या. प्लॅस्टिकचे कप, पिशव्या, थर्माकोल, कपडे व चिंध्यांचा कचरा
  • अहिल्यादेवी शाळेशेजारील कचराकुंडय़ाही जवळपास भरलेल्या
  • आपटे रस्त्याजवळ सेंट्रल पार्क हॉटेलशेजारच्या दोन्ही कचराकुंडय़ा भरलेल्या
  • पर्वती पायथ्याजवळील कचराकुंडी भरून कचरा रस्त्यावर पसरलेला

पर्वतीकडून लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुग्णालयाच्या पुढील संपूर्ण भागात कचरा व दरुगधीचे साम्राज्य, इतस्तत: फिरणारी डुकरांची फौज

कचरा कुजून तयार होणाऱ्या दरुगधीयुक्त वायूंमुळे अस्थमा, जुनाट खोकला असे आजार असलेल्या व्यक्तींचा त्रास वाढतो. आजार नसलेल्यांनाही अशा सततच्या दरुगधीने दम कोंडल्यासारखे वाटते. कचराकुंडय़ांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना दिवसभर मरगळ व उदासीनता वाटणे, कचऱ्याचा त्रास आणखी वाढल्यास डोके दुखणे, मळमळणे, गरगरणे अशाही समस्या उद्भवू शकतात. उपाहारगृहांच्या आजूबाजूलाही कचरा हमखास साठत असल्याचे दिसून येते व आजूबाजूच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने त्याचा त्रास संभवतो.’’

– डॉ. अविनाश भोंडवे, फिजिशियन

महापालिकेची कारवाई तोकडीच

विविध प्रकारे अस्वच्छता पसरवण्याबद्दल महापालिकेतर्फे दंड आकारला जात असला तरी शहरातील स्वच्छतेचे एकूण चित्र पाहता ही कारवाई तुटपुंजीच असल्याचे समोर येत आहे. महापालिकेने अस्वच्छतेसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडापोटी गेल्या सहा महिन्यांत १४ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे, परंतु कचऱ्याचे ढीग, कचराकुंडय़ांमध्ये एकत्रितपणेच टाकला जाणारा ओला व सुका कचरा, त्यातील प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचऱ्याचे मोठे प्रमाण ही स्थिती तशीच आहे.

महापालिकेने मार्च ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अस्वच्छता फैलावण्याबद्दल ५,५५९ जणांवर कारवाई केली आहे, तसेच विविध १२१ प्रकरणांमध्ये नोटिसा बजावण्यात आल्या असून ४८ खटले दाखल करण्याची पालिकेने तयारी केली आहे, मात्र यातील एकच खटला आतापर्यंत दाखल झाला आहे.

रस्त्यावर थुंकणाऱ्यांना लगाम कोण घालणार?

रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण पुण्यात मोठे असून या पिचकारीबहाद्दरांचा त्रास नागरिकांना दररोज सहन करावा लागत आहे. थुंकणाऱ्यांवरही पालिका कारवाई करते, परंतु वास्तविक पाहता त्या माध्यमातून थुंकणाऱ्यांना थांबवण्यात यश येत नसल्याचेच वारंवार दिसून आले आहे. सरकारी इमारतींसह इतरही वास्तूंत थुंकल्यामुळे रंगलेले जिने, वाहन चालवत असताना पुढच्या व्यक्तीने अचानक मारलेली पिचकारी आणि त्याचा बाजूने वाहन चालवणाऱ्यास किंवा पायी चालणाऱ्यास होणारा त्रास कायम आहे. परंतु पिचकारी मारणाऱ्यांना बोलणार तरी कोण, अशीच भावना नागरिकांकडून व्यक्त होते.

स्वच्छता अभियानाची आरंभशूरता

दोन वर्षांपूर्वी वाजत गाजत सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान हे गांधीजयंतीच्या दिवशी हाती झाडू घेऊन सेल्फी घेण्यापुरतेच उरल्याचे दिसत आहे. अभियान सुरू झाल्यानंतर शहरावर त्याचा काहीच परिणाम झालेला दोन वर्षांमध्ये दिसलेला नाही. या अभियानाचा उत्साह देखील आता मावळला असल्याचे दिसत आहे.

दोन ऑक्टोबर २०१४ – सकाळपासून शहरातील सगळ्या स्तरातील नागरिक उत्साहाने झाडू घेऊन उत्साहाने कामाला लागले होते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बागा, बसस्थानके, रेल्वे स्थानके, महाविद्यालये, शाळा, ऐतिहासिक ठिकाणे, नदी काठचा परिसर यांबरोबरच रहिवासी सोसायटय़ा स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने पुढाकार घेतला. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारीही स्वच्छता करताना दिसत होते. सरकारी कार्यालयांनी कोपऱ्यातील तंबाखूच्या पिचकाऱ्यांची रंगरंगोटी झाकण्यासाठी भिंतीही रंगांनी रंगवल्या. या अभियानाला इतका प्रतिसाद मिळाला की या दिवशी झाडूंचीही विक्रमी विक्री झाली होती. यापुढे स्वच्छ शहराचेच चित्र आपल्याला कायम दिसेल अशी आशा वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रत्यक्षात आता दोन वर्षांनी शहराची स्थिती पूर्वीसारखीच अस्वच्छ आहे. रस्त्यावर पसरलेला कचरा, कचरा वेळेत न उचलल्यामुळे वाहून जाणाऱ्या कचरा कुंडय़ा, त्यावर जमलेले भटके कुत्रे, डास, माश्या जागोजागी दिसत आहेत. अभियान सुरू झाले तेव्हा समाजमाध्यमे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्याचे, अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करणारे संदेश फिरत होते. काही सोसायटय़ा, संस्थांनी, नागरिकांनी अभियानात सहभागी होणे बंधनकारक केले होते. आता मात्र या अभियानाचा उत्साह ओसरला आहे.