नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडीरेकनर) दरात राज्यात सर्वाधिक वाढ पुण्यात केली आहे. या दरात शहरात १.५६ टक्के  वाढ झाल्याने मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमधील सदनिकांचे भाव चढेच राहणार आहेत. परिणामी पुण्यात हक्काचे घर आवाक्याबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हे वाढीव दर शनिवारपासून (१२ सप्टेंबर) लागू झाले आहेत.

शहराच्या मूळ हद्दीत १.२५ टक्के  आणि विस्तारित हद्दीसाठी १.८८ टक्के  अशी शहरात सरासरी १.५६ टक्के  वाढ झाली आहे. परिणामी शहराच्या सर्वच भागात रेडीरेकनरचे दर वाढले आहेत. कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या ठिकाणी नेहमीच रेडीरेकनरचे दर सर्वाधिक असतात. या ठिकाणी हा दर अनुक्रमे १४ हजार ५८० आणि १३ हजार १६७ प्रति चौरस फू टपर्यंत पोहोचला आहे. कोरेगाव पार्क रस्त्यावरील रेल्वे ओलांडणी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंतचा परिसर शहरातील सर्वाधिक महाग परिसर आहे. तर, प्रभात रस्त्यावरील ज्ञानकोशकार केतकर रस्ता (आयकर रस्ता) हा भाग दुसऱ्या क्रमांकावर महाग परिसर आहे. याशिवाय ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणारा रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डॉ. केतकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, बोट क्लब रस्ता, नॉर्थ मेन रोड ते भैरोबा पंपिंग स्टेशन, कर्वे रस्ता, फग्र्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि आयडियल कॉलनी हे परिसर देखील महागडे झाले आहेत.

दरम्यान, मध्यवर्ती पेठांमध्ये सदाशिव आणि नवी पेठेत प्रति चौ. फूट दर ९८७९ रुपये करण्यात आला आहे. नारायण पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठ या भागातील दर सरासरी आठ हजार रुपये प्रति चौ. फूट झाले आहेत. अन्य पेठांपैकी रविवार पेठेत ७३३७ रुपये, गणेश पेठ ६२८७ रुपये, मंगळवार पेठ ६८४२ रुपये, सोमवार पेठ ७०२६ रुपये, रास्ता पेठ ६१९१ रुपये, नाना पेठ ६३९८ रुपये आणि  भवानी पेठ ७५४१ रुपये असे झाले आहेत. तर, महापालिके त नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी, उंड्री, आंबेगाव बु., फुरसुंगी या भागात सरासरी तीन ते चार हजार रुपये प्रति चौ. फूट दर झाले आहेत.

मध्यवर्ती भागातील सदनिकांसाठी रेडीरेकनरचे दर (चौ. फुटांमध्ये)

सदाशिव पेठ, नवी पेठ आणि दत्तवाडी (९,८७९), शनिवार पेठ (८,०२६), शुक्रवार पेठ (८,०८८), कसबा पेठ (६,८८७), नारायण पेठ (८६३८), बुधवार पेठ, लक्ष्मी रस्ता (८०९०), रविवार पेठ (७,३३७), गणेश पेठ (६,२८७), मंगळवार पेठ (६,८४२), सोमवार पेठ (७,०२६), रास्ता पेठ (६,१९१), नाना पेठ (६,३९८), भवानी पेठ (७,५४१)

अन्य प्रमुख भागांमधील सदनिकांसाठी रेडीरेकनरचे दर (चौ. फु टांमध्ये)

वारजे (६,९८६), हिंगणे खुर्द (६,३२४), वडगाव बु. (६,७३६), धायरी (५,२५८), कात्रज (६,३९३), कोंढवा खु. (६,४३५), हडपसर (८,२७४), बाणेर (८,५००), बालेवाडी (७,४६४), पाषाण (८,४७७), सहकारनगर (८,९४१)