X

…तर पुण्यातील ‘सिंगल स्क्रिन’ चित्रपटगृहाचे मालक संपावर जाणार

विविध मागण्या अद्याप प्रलंबित

वस्तू आणि सेवा कर तसेच इतर अनेक तरतुदींमुळे पुण्यातील एक पडदा चित्रपटगृह चालवणे कठीण झाले आहे. येथील चित्रपटगृहांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास या चित्रपटगृहांचे मालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटगृहांच्या मालकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

सदानंद मोहोळ म्हणाले, प्रत्येक तिकिटामागे मिळणाऱ्या सेवा शुल्कसंदर्भात स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे चित्रपटगृहाच्या देखभालीची सर्व जबाबदारी ही चित्रपटगृह मालकावर येते. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यासाठी प्रत्येक तिकिटामागे मिळणारे सेवा शुल्क कायदेशीर स्वरुपात मिळवण्याची तरतूद करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अ, ब, क आणि ड दर्जा असणाऱ्या नगरपालिका तसेच ग्रामपंचायतमधील चित्रपटगृहांच्या नुतनीकरणाच्या मुद्याकडेही लक्ष वेधले. सरकारी अध्यादेशानुसार या परिसरातील एक पडदा चित्रपटगृहांना करमणूक कर परताव्यातून दिलेली सूट स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वीच्या धोरणाप्रमाणे सूट देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. चित्रपटगृह मालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास एक पडदा चित्रपटगृहाचे सर्व मालक संपावर जातील, असा इशारा मोहोळ यांनी दिला आहे.

Outbrain