पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांसाठी प्रशासनाचे आदेश

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण अतिरिक्त २२०० साध्या खाटा उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत प्राणवायू सुविधा असलेल्या खाटांची जास्त मागणी असल्याने या अतिरिक्त २२०० खाटांना प्राणवायूची सुविधा जोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार येत्या ३० सप्टेंबपर्यंत पुण्यात १७६९, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ४३१ प्राणवायूच्या खाटा वाढणार आहेत.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘गेल्या आठवडय़ात १ ऑक्टोबपर्यंत शहरासह जिल्ह्य़ात नव्याने किती करोनाबाधित रुग्ण आढळतील, या नव्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किती खाटा उपलब्ध कराव्या लागतील, याबाबतचा अंदाज घेण्यात आला. त्यानुसार सध्या साध्या खाटा जास्त उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पुणे शहरात १७६९, तर पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात ४३१ अतिरिक्त साध्या खाटा असल्याचे दिसून आले आहे. या सर्व खाटा खासगी रुग्णालयांच्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना या सर्व साध्या खाटांना प्राणवायूची यंत्रणा जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्राणवायू खाटांची कमतरता भासणार नाही.’

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२१ सप्टेंबर) खासगी रुग्णालयांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खाटा वाढवल्यास त्याप्रमाणात जादा प्राणवायूचा पुरवठा करावा आणि अतिरिक्त मनुष्यबळही पुरवण्यात यावे अशा दोन प्रमुख मागण्या खासगी रुग्णालयांनी प्रशासनाकडे के ल्या आहेत. त्यानुसार प्राणवायूच्या खाटा वाढवल्यास त्याप्रमाणात जादा प्राणवायूचा पुरवठा संबंधित रुग्णालयांना के ला जाईल. तसेच मनुष्यबळ पुरवणाऱ्या कं पन्यांसमवेत येत्या गुरुवारी (२४ सप्टेंबर) बैठक आयोजित करण्यात आली असून खासगी रुग्णालयांना अतिरिक्त डॉक्टर, परिचारिकांसह इतर कर्मचारी पुरवण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे, असेही राव यांनी सांगितले.

मोठी करोना केंद्रे आणि ससूनमध्ये मिळून ३०० खाटा

येत्या ३० सप्टेंबपर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरीतील अण्णसाहेब मगर क्रीडांगण या दोन्ही मोठय़ा करोना काळजी के ंद्रांमध्ये, तसेच ससून रुग्णालयात मिळून एकू ण ३०० खाटा वाढवण्यात येणार आहेत. तसेच पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालय आणि पुण्यातील बाणेर येथील करोना काळजी केंद्रातही खाटा वाढवण्यात येणार आहेत, असेही राव यांनी सांगितले.

ससूनमध्ये प्राणवायू यंत्रणेसह मनुष्यबळाची कमतरता

पुणे : ससून रुग्णालयात प्राणवायू यंत्रणेचे काम सुरू आहे. तसेच अतिरिक्त मनुष्यबळाची कमतरता असल्याने क्षमता असूनही याठिकाणी जास्त खाटा वाढवता येत नसल्याची कबुली प्रशासनाने मंगळवारी दिली.

करोना सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘ससूनमध्ये गेल्या काही दिवसांपासून खाटा वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता नव्या इमारतीमध्ये प्राणवायू यंत्रणेचे काम सुरू आहे. खाटा वाढवण्यात आल्यानंतर लागणारे अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध नाही. त्याकरिता एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी कं पन्यांकडून ससूनमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ भरती के ले जाणार आहे. ससूनची क्षमता ५४६ खाटांची असून ती ८५० खाटांपर्यंत वाढवता येऊ शकते. सध्या याठिकाणी ३५० करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.’

दरम्यान, पुण्यातील एकू ण परिचारिकांपैकी ५० टक्के  परिचारिका के रळमधील आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालये तसेच मोठय़ा करोना काळजी के ंद्रांमध्ये खाटा वाढवल्यानंतर डॉक्टरांची कमतरता भासू शकते. शहरातील अनेक खासगी डॉक्टरांकडून काही कारणांनी सध्या सेवा दिली जात नाही.

अशा डॉक्टरांना शोधून त्यांना शासकीय, खासगी रुग्णालये किं वा करोना काळजी केंद्रांमध्ये सेवा देण्याबाबत सांगण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसऱ्या वर्षांची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि आंतरवासीय (अँप्रेंटिसशीप) प्रशिक्षणार्थीना करोना रुग्णांवर उपचारांसाठी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही राव यांनी सांगितले.