X
Advertisement

पुण्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सर्रासपणे गैरवापर! ६३९ कोविड रुग्णालयांच्या ऑडिटचे निष्कर्ष!

पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा गैरवापर होत असल्याची बाब ऑक्सिजन ऑडिटमधून समोर आली आहे.

करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे, याचं गांभीर्य गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासोबतच देशात काही ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमधून समोर आलं आहे. पुणे शहरात देखील काही रुग्णालयांनी ऑक्सिजनचा अपुरा साठा किंवा पुरवठा असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, संपूर्ण पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा सर्रासपणे गैरवापर आणि वाया जाण्याचे प्रकार दिसून आल्याचे गंभीर निष्कर्ष या रुग्णालयांच्या परीक्षण अहवालातून समोर आले आहेत. राज्य सराकरने या ऑडिटसाठी नेमलेल्या पथकांनी हे परीक्षण केलं असून त्यातून समोर आलेले निष्कर्ष प्रशासनाची चिंता वाढवणारे ठरले. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यासंदर्भात संबंधित रुग्णालयांना तातडीने निर्देश देण्यात आले असून आता ऑक्सिजन वापराची परिस्थिती नियंत्रणात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजनची उपलब्धता आणि व्यवस्था देखील योग्य प्रकारे करण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ऑक्सिजनची समस्या निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारकडून राज्यातील रुग्णालयांच्या ऑडिटचे आदेश देण्यात आले. त्यानुसार “पुणे जिल्ह्यातल्या एकूण ६३९ रुग्णालयांचं ऑडिट करण्यासाठी प्रत्येकी २ प्राध्यापक असणाऱ्या एकूण १११ पथकांची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा यामध्ये समावेश होता. या दोघांनाही ऑडिट आणि ऑक्सिनचा योग्य वापर कसा करावा, त्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. हे प्रशिक्षण त्यांनी ऑडिट केलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देणं अपेक्षित होतं”, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी दिली.

काय आढळलं या पथकांना?

या १११ पथकांच्या निरीक्षणात आलेल्या काही प्रमुख मुद्द्यांविषयी देशमुख यांनी माहिती दिली.

१. कोविड रुग्णाला ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशन असणं गरजेचं असताना काही ठिकाणी तो ९८ टक्क्यांपर्यंत होता. हे गंभीर आणि धोकादायक आहे. रुग्णालयांना त्याच्या धोक्यांसदर्भात माहिती देण्यात आली आहे.

२. साधारणपणे दोन लिटर ऑक्सिजन प्रतिमिनीट देणे अपेक्षित असताना काही रुग्णालयांमध्ये तब्बल ८ लिटरपर्यंत ऑक्सिजन प्रतिमिनट वापरला जात होता.

. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती होत असल्याचं निदर्शनास आलं. ही गळती पाईपलाईन, वॉल्व्ह किंवा इतर ठिकाणाहून हत होती. वॉर्ड किंवा आयसीयूमध्ये ऑक्सिजन पुरवणाऱ्या ऑक्सिजन टँक्समध्येच ही गळती दिसून आली. यासंदर्भात संबंधित रुग्णालयांना तातडीने दुरुस्ती काम करून त्याची देखभाल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

४. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नर्सच्या अनुपस्थितीत रुग्ण स्वत:च ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त करत होते. हा देखील गंभीर ठरू शकणारा प्रकार होता.

५. काही रुग्ण आवश्यकता नसताना देखील ऑक्सिजनचा वापर करत होते. बऱ्याच रुग्णालयांमध्ये हा प्रकार दिसून आला. रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा केली जात नव्हती.

“…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

आता परिस्थिती नियंत्रणात!

दरम्यान, या सर्व प्रकारांविषयी संबंधित रुग्णालयांना आवश्यक त्या सूचना आणि प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. तसेच, आता पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजनची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील ते म्हणाले. पुण्याला सध्या प्रतिदिन ३०० ते ३२५ टन ऑक्सिजनची गरज आहे. चाकण, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशा अशा चार प्रकल्पांमधून पुण्याला ऑक्सिजन मिळतो. कर्नाटकमधून येणारा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. चाकणमधले दोन प्लांट बंज पडले होते, पण ते आता पुन्हा सुरू झाले आहेत, अशी माहिती देखील देशमुख यांनी दिली आहे.

20
READ IN APP
X