गेल्या दोन दशकांमध्ये देशभरात ३ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये राज्यातील ६६ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशी परिस्थिती असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार स्थापन करत असल्याचा दावा केला जात आहे, अशा शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी शनिवारी राजकीय स्थितीबद्दल टिप्पणी केली. ज्या कालखंडात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या त्या काळात केंद्रामध्ये कृषिमंत्री कोण होते, हे मी सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्यातर्फे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात साईनाथ बोलत होते. ‘टेलिंग द स्टोरिज ऑफ ८३३ मिलिअन – द चॅलेंज ऑफ रिपोर्टिग द इंडियन कंट्रीसाईड इन द डिजिटल एज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. सेंटरचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, लतिका पाडगावकर आणि डॉ. शां. ब. मुजुमदार या वेळी उपस्थित होते.

साईनाथ म्हणाले,की देशातील सध्याची पिढी ही जणू परदेशी नागरिक बनून राहात आहे. या पिढीचा ग्रामीण भारताशी काहीही संबंध नाही. ही बाब निश्चितच धोकादायक अशीच आहे. दुर्दैवाने भारतीय जनगणनेत ग्रामीण भारताची कोणतीही व्याख्या नाही. शहरी नसलेली कोणतीही गोष्ट ही ग्रामीण मानली जाते या पेक्षा मोठी शोकांतिका नाही.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान गुंफणारे पी. साईनाथ यांचा डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.