24 February 2021

News Flash

भाताच्या शेतीतून काळ्या बिबटय़ाची प्रतिमा

इंगळहळ्ळीकर हे उद्योजक आणि वनस्पती तज्ज्ञ आहेत.

वनस्पतितज्ज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या आवारात भातशेतीमध्ये ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून काळ्या बिबटय़ाचे (ब्लॅक पँथर) चित्र साकारण्यात आले आहे. 

सिंहगड पायथ्याच्या डोणजे फाटा येथे भाताच्या लागवडीतून काळ्या बिबटय़ाचे (ब्लॅक पँथर) चित्र साकारण्यात आले आहे. जपानमध्ये ‘पॅडी आर्ट’ नावाने प्रचलित असलेली ही कला वनस्पतितज्ज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी साकारली आहे.

इंगळहळ्ळीकर हे उद्योजक आणि वनस्पती तज्ज्ञ आहेत. इंटरनेटवर ‘पॅडी आर्ट’ बद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी ही कला गेल्यावर्षीपासून पुण्यात साकारण्यास सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी साकरण्यात आलेला गणपती पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. आता यंदा भात शेतीच्या या चित्रात काळा बिबटय़ा दिसणार आहे. या शेतीचित्राचा आकार १२० बाय ८०  फूट एवढा आहे.

पॅडी आर्टसाठी जमिनीचा कॅन्व्हासप्रमाणे वापर करण्यात येतो. विविध रंग मिळतील अशा वाणांची भाताची रोपे लावून हे चित्र साकारण्यात येते. शेत उभे राहिले की चित्र अधिक स्पष्ट होत जाते. उंचावरून हे चित्र अधिकच स्पष्ट दिसते. गेल्या काही दिवसांपासून हे शेतीचित्र पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत हे शेतीचित्र पाहता येईल.

पॅडी आर्टचा जन्म

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्य़ात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षांनुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते.  या भातशेतीला १९९३मध्ये दोन हजार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ किंवा ‘टॅम्बो अटा’ ही जपानमध्ये प्रसिद्ध झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 4:00 am

Web Title: paddy art in rice cultivation black panther pictures
Next Stories
1 ब्रॅण्ड पुणे : सात हजारांहून अधिक घरांत ‘अभिनव’ची भाजी
2 इंधनासाठी वाढीव करामुळे तेल कंपन्यांचा नफा दुप्पट!
3 अनधिकृत बांधकामांना चाप बसण्याची शक्यता
Just Now!
X