News Flash

विरोधामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवरच भीतीचे सावट

मधुर भांडारकर यांचे मत

मधुर भांडारकर यांचे मत

‘इंदू सरकार’ या चित्रपटातून नवीन पिढीपर्यंत आणीबाणीसारखी घटना पोहोचविण्याचा माझा उद्देश होता. मात्र त्याला विरोध करण्यात आला. पत्रकार परिषद बंद पाडणे, माझ्यावर शेकडो कार्यकर्त्यांचे मोर्चे काढणे अशा घटना घडल्या. ‘आज मेरे साथ हुआ, कल किसी और के साथ होगा’ असे म्हणूनसुद्धा कोणीही माझ्या बाजूने उभे राहिले नाही. हेच चित्र आता ‘पद्मावत’च्या निमित्ताने पाहायला मिळाले. चित्रपटसृष्टी भीतीच्या सावटाखाली असल्याने कोणीही कोणाच्या बाजूने उभे राहत नाही, अशी खंत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रविवारी व्यक्त केली.

आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवात भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट दाखविण्यात आला. हे औचित्य साधून संजय दावरा यांनी साधलेल्या संवादातून व्हिडिओ कॅसेट विक्रेता ते यशस्वी दिग्दर्शक हा भांडारकर यांचा प्रवास उलगडला. भांडारकर म्हणाले, चित्रपटसृष्टी सतत भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. ‘आँधी’ चित्रपटालाही त्या काळात जोरदार विरोध करण्यात आला होता. ‘किस्सा कुर्सी का’ चित्रपटाची ‘प्रिंट’ जाळण्यात आली होती. पुस्तक लिहिणाऱ्यांना विरोध होत नाही, मग चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनाच का विरोध होतो? ‘ज्याने त्याने आपापले पाहावे’ हा जगाचा अलिखित नियम झाला आहे. त्यामुळेच कोणा एकावर संकट आले, तर त्याच्या बाजूने कोणी उभे राहत नाही. ‘इंदू सरकार’च्या वेळी माझ्या बाजूने कोणी उभे राहिले नव्हते. सरकार कोणतेही असो, चित्रपटांना विरोध होतोच, कारण चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहण्याची मानसिकता आजही आपल्या समाजात रुजलेली नाही.

‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘कॉर्पोरेट’ या चित्रपटांतून मी स्त्रीच्या नजरेतून विषय मांडायचा प्रयत्न केला. माझे चित्रपट सामाजिक विषयांवर बोलणारे असून देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, समीक्षकांकडून नावाजले गेले आणि त्यांनी पैसाही कमावला याबद्दलचे समाधान वाटते, असेही भांडारकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत ‘समाज माध्यमां’चे प्रस्थ वाढले आहे. ‘ट्विटर’सारख्या माध्यमात केलेले एखादे विधानही तुम्हाला प्रचंड टीकेला तोंड द्यायला लावते. अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीतीलच काय, पण सामान्य माणूसही घाबरलेला असल्याचे भांडारकर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 3:42 am

Web Title: padmaavat film scripts should not be censored says madhur bhandarkar
Next Stories
1 शिवसेना स्वतंत्र लढू शकणार नाही – पृथ्वीराज चव्हाण
2 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे पुण्यात लक्ष
3 सरकारविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या
Just Now!
X