पोलिसांकडून संबंधित तरुणांचा शोध सुरू

हिंजवडीमधील रस्त्यांवर काही तरुण पाकिस्तानी झेंडा घेऊन दुचाकीवरून जात असतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. पोलिसांनी त्या अधारे त्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरामध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास काही तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवरून जातानाचे दृश्य पुणे पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही कक्षात दिसून आले. पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत तत्काळ माहिती दिली. पुलवामा येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी तातडीने पावले उचलली.

नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तीनही पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरू केला आहे.शनिवारी संबंधित तरुणांचा पोलिसांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशीही दिवसभर विविध पथकांच्या माध्यमातून तरुणांचा शोध घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नव्हती.