टाळ-मृदंगांच्या गजरात व हरिनामाच्या घोषात अंगावर हलक्याशा पावसाच्या सरी घेत माउलींच्या पालखी सोहळ्याने अवघड दिवेघाट पार करून बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. त्यानंतर सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला. दरवर्षी दिवे घाट चढण्यासाठी रथाला पाच ते सहा बैलजोडय़ा लावाव्या लागत होत्या, मात्र यंदा रथाला अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्याने केवळ एका बैलजोडीच्या साहाय्याने घाट लीलया पार झाला.
पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम पूर्ण करून सोहळा दुपारी दिवेघाटात पोहोचला. माउलींच्या पालखी रथाला लष्कराच्या संशोधन व विकास संस्थेच्या वतीने अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. रथाचे वजन कमी करण्यात आले असून, बॅटरीचा वापर असलेली ही यंत्रणा बैलाचे श्रम कमी करते व रथ ओढण्यास हातभार लावते. घाटातून रथ न्यायचा म्हटल्यास पाच ते सहा बैलजोडय़ा लावाव्या लागत होत्या. यंदा हा टप्पा केवळ एका बैलजोडीनेच पूर्ण होऊ शकला.
घाटाचा अवघड टप्पा पूर्ण केल्यानंतर सोहळा झेंडेवाडीच्या हद्दीत आला. त्या ठिकाणी माजी मंत्री दादा जाधवराव, आमदार विजय शिवतारे, प्रांत संजय असवले, तहसीलदार सीमा होळकर, पंचायत समितीच्या सभापती सुजाता दगडे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले. दिवेघाट ते सासवड येथील पालखीतळाचे अंतर पार करण्यास सोहळ्याला तब्बल साडेतीन तासांचा कालावधी लागला. पालखी मार्गावर दुतर्फा पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
रात्री नऊच्या सुमारास सासवडच्या पालखी तळावर पालखी पोहोचली. तेथे खासदार सुप्रिया सुळे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष चंदूकाका जगताप आदी उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी दहा वाजता सासवडहून संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. शुक्रवारी सकाळी माउलींचा पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.