जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. सायंकाळी पालखीने आकुर्डी येथे मुक्काम केला. सोमवारी सकाळी पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे.
लाखो वैष्णवांच्या साक्षीने शनिवारी तुकोबांच्या पालखीने देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिरातून प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने इनामदार वाडय़ात मुक्काम केला. रविवारी सकाळी देहूकरांचा निरोप घेऊन पालखी आकुर्डी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात पालखीचे आगमन झाले. निगडी येथे भक्ती-शक्ती शिल्पसमूहाजवळ शहरवासीयांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. महापौर मोहिनी लांडे, आमदार अण्णा बनसोडे, लक्ष्मण जगताप, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, सहआयुक्त पांडुरंग झुरे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेते मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, आर. एस. कुमार तसेच हनुमंत गावडे, बाबासाहेब धुमाळ, श्रीरंग बारणे, अनंत कोऱ्हाळे आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी पालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
रात्री आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीने मुक्काम केला. तेव्हा स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी तुडुंब गर्दी केली. सोमवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचे ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांकडून जोरदार स्वागत करण्यात येत होते.