सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या आर्त ओढीने पंढरीच्या वाटेवर असलेल्या लाखो वैष्णवांच्या सोबतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे सोमवारी शहरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन झाले. भक्तिचैतन्याची अनुभूती देणारा सोहळा शहरात दाखल झाला अन् अवघ्या शहराला त्याची प्रचिती मिळाली. पालख्या व वैष्णवांचे पुणेकरांनी दिमाखदार व मनोभावे स्वागत केले.
पालख्या शहरात दाखल होत असल्याने वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी व स्वागतासाठी विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असलेली संत तुकोबारायांची पालखी िपपरी-चिंचवडकरांचा निरोप घेऊन पुणे-मुंबई रस्त्याने मार्गस्थ झाली. बोपोडी येथे दुपारी पालखीचा पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश झाला. आळंदीतील आजोळघरात मुक्कामी असलेली माउलींची थोरल्या पादुका येथे आरती घेण्यात आली. त्यानंतर फुलेनगर व संगमवाडीमार्गे पालखी नेण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
माउलींची पालखी दोन वर्षांपासून संगमनगरमार्गे येत असल्याने दोन्ही पालख्यांतील वारकऱ्यांचा संगम आता पाटील इस्टेट भागात होतो. त्यामुळे पालिकेच्या वतीने यंदाही पाटील इस्टेट भागामध्ये पालख्यांचे स्वागत करण्यात आले. पालख्यांचे आगमन संध्याकाळी होणार असले, तरी दुपारपासूनच शहरात िदडय़ा दाखल होऊ लागल्या होत्या. टाळ-मृदंगांचा गजरात सुरू असलेल्या अभंगांनी शहरातील रस्त्यावरील वातावरणच बदलून गेले होते. दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी व वारकऱ्यांचा संगम पाहण्यासाठी पाटील इस्टेट भागात भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी चारच्या सुमारास तुकोबांची पालखी वाकडेवाडी येथे दाखल झाली. काही वेळाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पाचच्या सुमासास ही पालखी पाटील इस्टेट भागात आली. त्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास माउलींची पालखी या ठिकाणी आली. दोन्ही पालख्यांच्या प्रवेशाच्या वेळी भाविकांनी एकच जल्लोष केला. फुलांचा वर्षांव व टाळ्यांचा कडकडाट करीत पालख्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या वतीने महापौर वैशाली बनकर, आयुक्त महेश पाठक यांनी पालख्यांचे स्वागत केले. दिंडीप्रमुखांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ देत पालखी सोहळा अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौकातून पुणे विद्यापीठ रस्त्यावर आला. पालखीतील माउली व तुकोबांच्या पादुकांना स्पर्श व्हावा, हीच प्रत्येकाची इच्छा होती. मोठय़ा गर्दीमध्ये शिरून काही जण पादुकांना स्पर्श करीत होते, तर काही जण गर्दीत जाणे शक्य नसल्याने मनोभावे हात जोडून पालखी रथाचे दर्शन घेत होते. रस्त्यालगत विविध ठिकाणी अनेक संस्था, संघटना व मंडळांच्या वतीने पालखीचे स्वागत होत होते. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी खाद्यपदार्थाचेही वाटप करण्यात येत होते. सर्वाचे स्वागत स्वीकारत पालखी सोहळा फग्र्युसन रस्त्यावर आला. त्याही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तुकोबांची पालखी संध्याकाळी सातच्या सुमारास तुकाराम पादुका मंदिराजवळ पोहोचली. त्या ठिकाणी आरती झाल्यानंतर लक्ष्मी रस्त्याने पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचली. माउलींचा पालखी सोहळा रात्री आठच्या सुमारास ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकामध्ये आला. या ठिकाणीही मोठय़ा संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सोहळा लक्ष्मी रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामासाठी गेला.
अन् माउलींची आरती झाली!
ज्ञानेश्वर माउली पादुका चौकामधील पूर्वीच्या मंदिरात माउलीच्या पादुका नेऊन आरती केली जात होती. रस्ता रुंदीकरणात या मंदिराचे स्थलांतर मागच्या बाजूला करण्यात आले. पालखी मार्ग व मंदिर हे अंतर काहीसे दूर असल्याने पादुका नव्या मंदिरापर्यंत नेणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगत येथील आरतीची परंपरा खंडित करण्यात आली. मात्र, मार्गावरच रथात आरती व्हावी, अशी इच्छा पादुका मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली होती. यंदा पादुका चौकामध्ये काही वेळ पालखी थांबवून आरती करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पालखीचे स्वागत करीत आरतीचा हा क्षण डोळे भरून पाहिला.
 वारकऱ्यांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ
राज्यात विविध भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे यंदा वारकऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत वारकऱ्यांची संख्या वीस टक्क्य़ांनी वाढली आहे. शहरातील वाहतुकीबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले, की फग्र्युसन आणि लक्ष्मी रस्ता वगळता इतर रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले होते. दिंडया शहरात दाखल झाल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक इतर रस्त्याने वळविण्यात आली.